जरांगे-सामंत भेटीने भाजप कार्यकर्ते भडकले

 जालना, १६ आॅक्टोबर २०२४ :  विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर  राजकीय पक्षांमध्ये घडामोडींन वेग आला आहे.  दरम्यान शिवसेना नेते आणि  उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री मराठा आंदोलक  मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट घेतल्याने भाजप कार्यकर्ते भडकले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जरांगे मुद्दाम टार्गेट करत असताना सामंत व मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी भेट घेणे कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मध्यरात्री अंतरवाली सराटीत दोघांमध्ये भेट झाली. दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे. अंतरवालीच्या सरपंचाच्या शेतात भेट झाल्याची माहिती आहे.  विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी घेतलेल्या भेटीला महत्त्व प्राप्त झाल आहे.  भेटीमध्ये काय चर्चा झाली याची अद्याप माहिती नाही. मनोज जरांगे यांनी त्यांचा पहिला दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे घेतला. या मेळाव्यात त्यांनी राज्यात उलथापालथ करण्याचे आवाहन मेळाव्याला संबोधित करताना केले. तसेच आचारसंहिता लागेपर्यंत राजकीय भाष्य करणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या आदल्या रात्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांनी मनोज जरांगेची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मनोज जरांगेंची भेट घेतली कारण, उदय सामंत म्हणाले…

मनोज जरांगे यांच्या भेटीवर बोलताना उदय सामंत म्हणाले,   मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी घनसावंगीला गेलो होतो. घनसावंगीवरून येताना मला सरपंचांनी सांगितलं की, मनोज जरांगेही या ठिकाणी मुक्कामी आहे.  म्हणून मी जरांगेंची भेट घेण्यासाठी गेलो आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील हे सुरुवातीपासूनच उपमुख्यमंत्री फडणवीस यांना मराठा आरक्षणावरून लक्ष करत आहेत. फडणवीस यांच्यामुळेच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही असा त्यांचा आक्षेप आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार पाडणार अशी भाषा जरांगे यांच्याकडून केली जात असताना जरा आज उदय सामंत यांनी जरांग यांची भेट घेतल्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. मित्रपक्ष असूनही विरोध करणाऱ्या जरांगेंना भेटणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे.