हेच का अच्छे दिन?; शिंदे सरकारच्या विरोधात संभाजीराजे मोर्चा काढणार
मुंबई, ३ ऑक्टोबर २०२४ ः स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती हे शिंदे सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचं अरबी समुद्रात भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली. मात्र ते अद्यापपर्यंत पूर्ण झालेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचं जलपूजन झालं. मात्र आता आठ वर्षे उलटून गेली असताना अद्याप शिवस्मारकाचं काम झालेलं नाही. यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज संभाजीराजे यांनी सरकारला घेरलं आहे. येत्या सहा ऑक्टोबरला संभाजीराजे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला जाणार आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन केलं जाणार आहे.
संभाजीराजे यांनी शिंदे सरकारला इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही. चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला, असं म्हणत संभाजीराजे यांनी मोर्चाची हाक दिली आहे. चलो मुंबई… हेच का अच्छे दिन? असा सवालही संभाजी राजे यांनी केला आहे.
मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप – शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही… चला तर मग, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला… रविवार, दि. ०६ ऑक्टोबर २०२४ रोजी, सकाळी ठीक ११ वाजता स्थळ : गेट वे ऑफ इंडिया, मुंबई, असे मेसेज कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुकीआधी संभाजीराजे छत्रपती हे अॅक्टिव्ह मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. स्वराज्य या त्यांच्या पक्षाला ‘सप्तकिरणांसह पेनाची निब’ हे चिन्हही निवडणूक आयोगाने दिलं आहे. अशातच आता ते सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. शिवस्मारकावरून त्यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत.