महाराष्ट्र विधानसभेच्या तारखा या काळात असणार – निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

मुंबई, २८ सप्टेंबर २०२४: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसीय दौऱ्यात त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. या आढाव्यासाठी आयुक्तांनी सर्व शासकीय यंत्रणा आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. आयुक्त राजीव कुमार यांनी १० राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. दिवाळीच्या सुट्ट्यांचा विचार करून मतदानाची तारीख निश्‍चित केली जाणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी निवडणूक आयुक्त राजीव कुमार ते म्हणाले, या महाराष्ट्र दौऱ्यात आम्ही ११ पक्षांशी चर्चा केली आहे. आम्ही आमचा महाराष्ट्र, आमचं मतदान अशी टॅगलाईन घेतली आहे. दिवाळी, देव दिवाळी असे सण येत्या काळात आहेत. त्या गोष्टी पाहूनच निवडणुका जाहीर कराव्यात. निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना सलग सुट्ट्या असू नयेत, याची काळजी घ्यावी, आठवड्यातील मधल्या दिवशी निवडणुका घ्यावात, जेणेकरून लोक सुट्टी घेऊन बाहेर जाऊ नयेत, लोकांना मतदान करावे, अशी सूचना राजकीय पक्षांनी केल्याचं आयुक्तांनी सांगितलं.

पुढं बोलतांना ते म्हणाले, काही पक्षांनी मतदान केंद्रावर सुविधा देण्याची मागणी केली. बूथ एजंट त्याच भागातील न ठेवता मतदारसंघातील ठेवावा, अशीही पक्षांची मागणी आहे. २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यापूर्वी राज्यात विधानसभा निवडणुका व्हायला हव्यात, असंही त्यांनी सूचित केल्याचं आयुक्तांनी सागितलं. त्यामुळं सण-उत्सव टाळून निवडणूक लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.

तर काही पक्षांनी पैशाची ताकद रोखण्याची विनंती केली. पोलिंग स्टेशन दूर आहेत. वृद्धांना येण्या जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याची मागणी केली. मतदान केंद्रांवर मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी घालण्याची मागणीही पक्षाने केली आहे. फेक न्यूजवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केल्याचं आयुक्तांनी सांगितलं.

राजकीय पक्षांच्या सूचनांचा विचार करून निवडणुकीच्या काळात काही निर्बंध लादले जातील. एटीएमसाठी पैशांचा पुरवठा करणाऱ्या व्हॅनला वेळेचं बंधण असणार आहे. तसेच या काळात रुग्णवाहिका, बँका आणि पतसंस्थांवरही लक्ष ठेवले जाईल, असेही राजीव कुमार यांनी सांगितले.

मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही लावणार
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केली. ५० टक्के बूथवर वेब कास्टिंग होणार आहे. शहरी भागातील मतदान केंद्रांवर १०० टक्के सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे. मतदानकेंद्रावर शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची सोय असेल. जिथे लांबच लांब रांग असेल तिथे खुर्च्यांची व्यवस्था असेल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक सुविधा दिल्या जातील. मतदारांच्या अडचणीसाठी सक्षम ॲप तयार केले आहे, असं आयुक्तांनी सांगितलं.

महिला मतदारांच्या संख्येत वाढ…
राज्यात पुरुष मतदारांची संख्या ४.९५ कोटी असून महिला मतदार ४.६४ कोटी आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या ५९९७ आणि दिव्यांग मतदारांची संख्या 6.32 लाख इतकी आहे. यंदा नवीन मतदारांमध्ये प्रथमच मतदान करणाऱ्यांची संख्या १९.४८ लाख आहे. राज्यात महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं.