बावनकुळे म्हणाले, मुलासाठी ना फडणवीसांकडे मदत मागितली ना शहांशी

अकोला, १३ सप्टेंबर २०२४ : नागपूर येथे नुकतच एक ऑडी कारच्या हिट अँड रन प्रकरण घडलं. त्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुलगा संकेत बावनकुळे यांच्या नावावर नोंद असलेल्या ऑडी कारच्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. मी कधी पोलिसांना फोन केला नाही, मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत दोन दिवस होते. पण, मी त्यांनाही काही बोललो नाही, असा दावा बावनकुळेंनी केला.

माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले,
गाडी चालवणाऱ्यावर कुठला गुन्हा आणि गाडीत बसणाऱ्यांवर कुठले गुन्हे याचा तपास सुरु आहे, मी एका गोष्टीवर ठाम आहे, चूक ज्या कोणाची असेल, मग तो माझा मुलगा असूदे किंवा सर्वसामान्यांचा, कडक कारवाई झाली पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले. अकोल्यात पत्रकार परिषद घेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. नागपूर हिट अँड रन प्रकरणावर प्रश्न विचारला असता, चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरील उत्तर दिलं आहे. “खरं तर मी यावर जास्त बोलू नये. पण मी खुल्या मनाचा आहे. कुठला विषय टाळत नाही. माझ्या वर्चस्वातून पोलीस तपासावर प्रेशर येणार नाही.

 कुणाचाही मुलगा असो

मी पहिल्याच दिवशी सांगितलं, की मी कधी पोलिसांना फोन केला नाही, एकदा फक्त काय घटना घडली याची माहिती घेतली होती. मी गृहमंत्री-केंद्रीय गृहमंत्री यांच्यासोबत दोन दिवस होतो, मी त्यांना काही बोललो नाही. मी एका गोष्टीवर फर्म आहे, ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. सामाजिक किंवा राजकीय जीवनात राहणाऱ्या परिवारांनी हे बघायला हवं. पोलिसांनी कुणाचाही मुलगा असो, माझा किंवा सर्वसामान्य माणसाचा, शिक्षा समान असावी, अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली. आता एकच भाग आहे गाडी चालवणाऱ्यावर कुठला गुन्हा, गाडीत बसणाऱ्यांवर कुठले गुन्हे याचा तपास सुरु आहे. गाडी चालवणारे आणि बसणारे लक्षात आले आहेत, त्यामुळे कारवाई होईल, असेही बावनकुळे म्हणाले.

ब्लड रिपोर्ट काय?

रविवारी मध्यरात्री नागपुरात झालेल्या अपघातात कार चालवत असलेल्या अर्जुन हावरे याच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण १०० मिलीलीटरमागे २८ मिलीग्रॅम, तर अन्य मित्र रोनित चिंतमवार याच्या रक्तात २५ मिलीग्रॅम इतके आढळले आहे. गाडी चालवताना एखाद्या व्यक्तीच्या रक्तात अल्कोहोलचे प्रमाण १०० मिलीलीटरमागे ३० मिलीग्रॅम इतके असणे सामान्य आहे. त्यामुळे संकेतचे दोन्ही मित्र थोडक्यात वाचलेत, असं म्हणता येईल. मात्र रक्ताचे नमुने अपघातानंतर तब्बल सात तासांनी गोळा केल्यामुळे संशय वाढलाय. विशेष म्हणजे अपघातानंतर काही वेळातच मेयो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीत दोघेही मित्र दारुच्या नशेत असल्याचे स्पष्ट केलं होतं.