मुंबई दौऱ्यात अमित शहांनी फडणवीसांना दिला कानमंत्र

मुंबई, ९ सप्टेंबर २०२४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौरा आटोपून दिल्लीकडे रवाना झाले आहे. मुंबई दौऱ्यादरम्यान शाहंनी भाजप नेत्यांसह महायुतीतील नेत्यांना महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ नये, जाहीर वाद टाळावेत अशा सूचना केल्या आहेत. मात्र, मुंबई सोडताना शाह आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याचे समोर आले आहे. वांद्रेतील गणेश मंडळाबाहेर शाह आणि फडणवीसांमध्ये संवाद झाला. हा संवाद दोनच नेत्यांमध्ये झाल्याने शाहंनी मुंबई सोडनाता फडणवीसांना नेमका काय कानमंत्र दिला याची चर्चा आता सुरू झाली आहे.

अमित शाह रविवारी (दि.८) मुंबईत दाखल झाले. यानंतर त्यांनी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली. या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या अनुशंगाने दीर्घ चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतक आज (दि.९) शाहंनी सपत्नीक लालबागच्या राजाचे दर्शन घेत आशिल शेलार यांच्या मतदारसंघातील सार्वजनिक गणपती मंडळाला भेट देत दर्शन घेतले. शाह दर्शन घेऊन बाहेर पडत असताना त्यांच्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस आणि भाजपचे अन्य नेते उपस्थित होते. मंडपातून बाहेर पडल्यानंतर शाहंनी हाताच्या इशाऱ्याने फडणवीसांना बोलावले.

फडणवीसांना केला इशारा
फडणीस शाहंच्या जवळ पोहचताच अमित शाह यांनी फडणवीसांच्या कानात काहीतरी सांगितले. यानंतर फडणवीसांनी मान हलवत शाहंना काहीतरी माहिती दिली. आता शाहंनी फडणवीसांना नेमका काय प्रश्न विचारला आणि फडणवीसांनी नेमका कशाला होकार दर्शविला याबाबत कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. मात्र, शाहंच्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दांडी मारल्याने आणि वांद्यातील गणपती मंडळाच्या भर गर्दीत शांहनी फडणवीसांना जवळ बोलवून नेमकं काय सांगितलं याची चर्चा आता सुरू झाली आहे.

जागा वाटपाकडे लक्ष
शहा हे दोन दिवस मुंबईत होते. राज्यात विधानसभेला महायुती असणार आहे. राज्यातील २८८ जागांपैकी भाजप किती जागा लढविणार याची चर्चा सुरु असताना आता १६० जागांचा आकडा समोर आला आहे. असे झाल्यास शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ ६४-६४ जागाच मिळू शकणार आहेत. त्यामुळे शहा यांनी मुंबईतील बैठकीत काय सांगितले याकडे लक्ष लागले आहे.