बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करणारा थापा शिंदे गटात
मुंबई, २६ सप्टेंबर २०२२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेला दिवसेंदिवस आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्या रूपाने रोजच धक्के बसत आहेत.आता तर ‘मातोश्री’वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सेवेकरी आणि त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहिलेला चंपासिंह थापा यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे मोठी चर्चा होत आहे.
थापा हे काही राजकीय व्यक्ती नाही. मात्र त्यांनी बाळासाहेबांची अनेक वर्ष सेवा केली आहे. यामुळे बाळासाहेबांचा थापांवर विशेष जिव होता. बाळासाहेबांचे निधन होण्यापूर्वी त्यांचे शेवटचे शब्द थापा यांच्याशी बोलले होते. थापा म्हणजे बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईतच होता. थापा हे भांडूपमधील तत्कालीन नगरसेवक दिवंगत के टी थापा यांच्यामुळे बाळासाहेबांचे सेवक म्हणून रुजू झाले होते. तेव्हापासून ते त्यांची सेवा करायचे. यामुळे ते बाळासाहेबांच्या सोबतच असायचे यामुळे बाळासाहेब आणि थापा यांच्यात एक जिव्हाळ्याच नात निर्माण झालं होत.
दरम्यान, आजघडीला शिवसेनेत उभी फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत थापा यांनी शिंदे गटात आज प्रवेश केला आहे. आता थापा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. याआधी बाळासाहेबांच्या कारच्या चालकांनीही शिंदेंच्या घरी भेट देत त्यांच्या भूमीकेला पाठिंबा दिला होता आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिंदेंनी आता थेट थांपांना आपल्या बाजूने वळवले आहे. यावरूनही आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होऊ शकते, असे बोलले जात आहे.