विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये नाही तर २६ नोव्हेंबरपूर्वीच

नवी दिल्ली, २१ आॅगस्ट २०२४ महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक मुदतीपूर्वी घेण्याचे घटनात्मक बंधन असल्यामुळे केंद्रीय केंद्रीय निवडणूक आयोगाला २६ नोव्हेंबरपूर्वीच सर्व प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. ही निवडणूक लांबणीवर पडण्यासाठी केंद्रातील तसेच राज्यातील सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला कोणतेही स्वारस्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयोगाने १६ ऑगस्टला पत्रकार परिषद घेत हरियाना आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. महाराष्ट्र व झारखंड विधानसभेच्या निवडणुकांचीही घोषणा अपेक्षित असताना ती न केल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. महाराष्ट्रातील निवडणूक मुदतीपूर्वी पार पडणे घटनात्मकदृष्ट्या बंधनकारक असून, ती नोव्हेंबर महिना पूर्ण होण्याच्या आतचघ्यावी लागणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी १६ ऑगस्टलाच पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. तरीही महाराष्ट्रातील निवडणूक निर्धारित मुदतीच्या पुढे ढकलली जाणार असल्याच्या चर्चेला पेव फुटले होते. मात्र, निवडणूक आयोग तसेच सत्ताधारी भाजपच्या वर्तुळात राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाविषयी कोणतीही संदिग्धता नसून ही निवडणूक मुदतीच्या आधीच होणार असल्याचेसूत्रांनी सांगितले.

सणासुदीच्या काळामुळे दोन टप्पे महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबरला संपणार आहे. प्रसंगी या मुदतीच्या आठवडाभर आधीच विधानसभेची निवडणूक होईल. पण निवडणूक एक दिवसानेहीपुढे ढकलली जाणार नाही, असे भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले. निवडणूक लांबणीवर पडण्याबाबतची चर्चा खोडसाळ आणि तथ्यहीन असल्याचे भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे. सध्या सणासुदीचा मोसम असल्यामुळे, तसेच एकाचवेळी सर्व चारही राज्यांमध्ये निवडणुका घेण्यासाठी लागणारे सुरक्षा दलउपलब्ध नसल्यामुळे चार राज्यांतील विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांमध्ये घेण्यात येत असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी स्पष्ट केले होते.