माझ्या नादाला लागू नका तुमच्या सभासुद्धा होऊ देणार नाही: राज ठाकरेंचा इशारा

छत्रपती संभाजीनगर, १० ऑगस्ट २०२४: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात राज ठाकरे काल बीड येथे त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्या. दौऱ्यात अन्य काही ठिकाणी त्यांना विरोधाचा सामना करावा लागला. यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप होत आहे. यावरच आज राज ठाकरे यांनी भाष्य करत ठाकरे पवारांवर घणाघाती टीका केली. माझ्या नादी लागू नका, माझं मोहोळ उठलं तर तुमच्याही सभा होऊ देणार नाही, असा सज्जड दम राज ठाकरेंनी भरला.

राज ठाकरे आज छत्रपती संभाजीनगरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटावर घणाघाती टीका केली. राज ठाकरे विरुद्ध मराठा समाज अशा बातम्या लावल्या गेल्या. २००६ झाली पक्ष स्थापनेपासून माझी भूमिका एकाच आहे आरक्षण आर्थिक निकषावर द्यावा. महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही. शिक्षण उद्योग उपलब्ध असताना इतर राज्यातील मुलांना मिळतं मात्र आपल्या राज्यातील मुलांना मिळत नाही. पुरून उरतील एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहेत.

आपल्या देशात महाराष्ट्रासारखं दुसरं राज्य नाही. इथे सगळ्या गोष्टी आहेत. बाहेरच्या मुलामुलींना त्या गोष्टी मिळू शकतात पण आमच् या मुलामुलींना मिळत नाही. या गोष्टी जर इथल्याच मुलामुलींसाठी नीट वापरल्या तर आरक्षणाची गरज नाही. आर्थिकदृष्ट्या आरक्षण देण्याऐवजी आपल्याकडे आता जातीचं राजकारण करून माथी भडकावण्याचं काम केलं जात आहे.

दहा वर्षांपासून नरेंद्र मोदी सत्तेत आहेत. ज्या मोदींनी बारामतीमध्ये सांगितलं मी पवारांचं बोट धरून राजकारणात आलो. मग त्या मोदींकडे पवार साहेब आरक्षण बद्दल का बोलले नाही. उद्धव ठाकरे पाच वर्ष होते त्यांनी का बोलले नाहीत. तुमचं राजकारण तुम्हालाच लख लाभ. पण माझ्या नादाला लागू नका, माझी मुलं काय करतील हे सांगता येणार नाही. तु्म्हाला घरी जाऊन पाठ, गाल बघावे लागतील असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

काल बीडमध्ये जो प्रकार घडला त्यात ठाकरे गटाचा जिल्हाप्रमुख होता. लोकसभेच्या निकालानंतर या लोकांना वाटलं की मराठवाड्यात आपल्याला मतदान झालं. तेव्हा या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे मतदान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या विरोधात झालेलं मतदान आहे. विरोधकांच्या प्रेमामुळे हे मतदान झालेलं नाही. आता विधानसभा निवडणुकीतही अशीच खेळी करावी असे या लोकांना (उद्धव ठाकरे, शरद पवार) वाटत आहे.