जरांगे पाटलांचे उपोषण स्थगित: सरकारला दिली एक महिन्याची मुदत

आंतरवाली सराटी, २४ जुलै २०२४:मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील हे १३ जुलैपासून उपोषणाला बसले होते. मात्र आता त्यांनी त्यांचं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने मनोज जरांगेंकडे दोन महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, मनोज जरांगे यांनी सरकारला १३ जून ते १३ जुलैपर्यंत एक महिन्याचा अवधी दिला होता. १३ जुलैपर्यत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न काढल्यामुळे मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसले. मात्र काल (मंगळवार, २३ जुलै) रात्री मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळली. परिणामी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने सलाईन लावली. त्यामुळे मनोज जरांगे नाराज झाले आहेत. “सलाईन लावून बेगडी उपोषण मी करणार नाही”, असं सांगत त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्यांनी सरकारला १३ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिली आहे. जरांगे पाटील सरकारला म्हणाले, “तुम्हाला दोन महिने हवे होते, त्यानुसार मी १३ ऑगस्टर्यंतची मुदत देतो. तुम्ही म्हणाला होता त्याप्रमाणे दोन महिन्यात दिलेला शब्द पाळा.”

मनोज जरांगे पाटील म्हणाले, “काल रात्री तब्येत खराब झाली होती, रक्तातील साखरेचं प्रमाण ६० पर्यंत घसरलं होतं. मला माझे सगळे सहकारी समजावत होते की तुम्ही सलाईन लावून घ्या. मी त्यांना म्हटलं, मला लढू द्या, उपोषण करू द्या, परंतु ते म्हणाले, आम्हाला तुम्ही हवे आहात आणि आरक्षणही हवं आहे. तुम्ही नसाल तर आम्हाला काही मिळणार नाही. रात्री माझ्याबरोबर काय होत होतं ते कळत नव्हतं. चार-पाच जणांनी माझे हात पाय धरले आणि सलाईन लावली. ही सगळी मंडळी या गोष्टी माझ्या मायेपोटी करत आहेत. ते मला म्हणतात, आम्हाला तुम्ही हवे आहात, आरक्षणही हवं आहे. तुम्ही राहिलात तर आरक्षण द्याल, तुम्ही मैदानात असाल तर आपल्या समाजाला न्याय मिळेल. म्हणून त्यांनी रात्री मला जबरदस्तीने सलाईन लावली.”