पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना झटका – माजी आमदार, शहराध्यक्षासह २५ माजी नगरसेवक शरद पवारांच्या आश्रयाला

पुणे, १७ जुलै २०२४ ः पिंपरी-चिंचवड शहरावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकहाती कारभार होता. त्यांचा शब्द तेथील कार्यकर्ते खाली पडू देत नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही तेथील आमदार, पदाधिकारी अजित पवारांच्या सोबत उभे राहिले. पण आता लोकसभेनंतर अजित पवार यांच्या वर्चस्वाला धक्का बसत आहे. आज पिंपरी चिंडवडमधील माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह २५ माजी नगरसेवकांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अजित पवार यांना धक्का बसला आहे.

माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष असलेल्या अजित गव्हाणे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष यश साने, शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले आणि भोसरी विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष पंकज भालेकर यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. त्यांच्यासह २५ माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश पार पडला. यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी विशाल काळभोर, विशाल वाकडकर यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर अजितदादांच्या गटाला पिंपरी- चिंचवडमध्ये धक्के सोसावे लागत आहेत. याचे कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणूक. संपूर्ण महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर लागलीच पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये सर्वेक्षण करून घेतले. त्यात शरद पवार यांच्याबाबत अजूनही सहानुभूतीची लाट असल्याचे दिसून आले. त्याचीच परिणीती पक्ष प्रवेशात झाल्याचे दिसून येत आहे.

आता गव्हाणे यांना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अजित यांच्या माध्यमातून गव्हाणे कुटुंबीयांची तिसरी पिढी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सक्रिय आहे. सुसंस्कृत, मितभाषी, उच्चशिक्षित व्यक्त्तिमत्व म्हणून ते परिचित आहेत. 2002 पासून चारवेळा ते महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले आहेत. 2007 मध्ये त्यांनी स्थायी समितीचे सभापतिपद सांभाळले होते. आता अजित गव्हाणे यांना भोसरीमधून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. परंतु, ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला मतदारसंघ सुटणार असे महायुतीचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते. सध्या भोसरीत भाजपचे महेश लांडगे आमदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपलाच सुटण्याचे निश्चित मानले आहे.

अशा परिस्थितीमध्ये भोसरीतून गव्हाणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर होती. त्यामुळे गव्हाणे यांच्याकडून पक्ष प्रवेशाचे संकेत येताच शरद पवार गटाकडून ‘रेड कार्पेट अंथरण्यात आले. आता त्यांच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी नवा चेहरा मिळू शकतो, अशी गणिते शरद पवार गटाने बांधल्याचा अंदाज आहे.