सरकारने मला आजपर्यंत रुपयाचाही निधी दिला नाही – आमदार आव्हाडांचे टीकास्त्र
मुंबई, ११ जुलै २०२४: राज्य सरकार विरोधी पक्षाच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकासकामं करण्यासाठी निधी देत असल्याचा आरोप विरोधकांनी अनेकदा केला. आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी निधी वाटपावरून सरकारवर जोरदार टीका टीका केली. शिंदे-फडणवीस सरकारने मला आजपर्यंत एक रुपयांचाही निधी दिलेला नाही. मी अजित पवार यांच्या पीएला १०० वेळा फोन केला, पण त्यांनी मला भेटीची वेळही दिली नाही, असा आरोप आव्हाड यांनी केला.
आव्हाड यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आजपर्यंत शिंदे सरकारने मला एक रुपयांचाही निधी दिलेला नाही. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो. माझ्या मतदारसंघातील जनताही महाराष्ट्राचे नागरिक आहेत. एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या विकासासाठी मला निधी द्या, असं आव्हाड म्हणाले.
ही कुठली पद्धत?
मी अजित पवार यांना १७ मे २०२३ रोजी निधीबाबत निवेदन दिले होते. याशिवाय मी अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या पीएला १०० वेळा फोन केला. मात्र, आजपर्यंत त्यांनी मला भेटीची वेळ दिली नाही. मला माझ्या घर कामासाठी पैसे नको आहेत. माझ्या मतदारसंघातील गरीब लोकांच्या कामासाठी पैसे हवेत. आमदाराला तीन वर्षात त्याच्यचा मतदारसंघातील कामासाठी एक रुपयाही देत नाहीत, ही कुठली पद्धत, असं आव्हाड म्हणाले.
मराठा आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ जुलै बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधी पक्षाने पाठ फिरवली. त्यामुळं सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर जोरदार टीका होत आहे. त्यावर बोलतांना आव्हाड म्हणाले की, राज्य सरकार दोन वर्षांपासून मराठा आणि ओबीसी समाजाला खेळवत होतं. तेव्हा राज्य सरकारला विरोधी पक्षाची आठवण झाली नाही. आता काहीच पर्याय म्हटल्यावर त्यांना विरोधी पक्षाची आठवण झाली. त्यांनी आता आमच्या नावाने खापर फोडण्याचं काम सुरू केलं, अशी टीका आव्हाडांनी केली.