मोकाटे, बाबर यांनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे, ८ जुलै २०२४ः आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शहरातील राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दोन माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर यांनी शनिवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे. या दोन्ही माजी आमदारांनी यावेळी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा माध्यमांशी बोलताना प्रदर्शित केली.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांची लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी होती, त्याच प्रमाणे विधानसभा निवडणुकीलाही आघाडी कायम राहणार असल्याचे आघाडीच्या नेत्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. पुणे शहरात विधानसभेच्या आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील दोन विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडे, पाच ठिकाणी भाजपचे तर एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे. आगामी निवडणुकीच्या जागा वाटपात काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी तीन तर ठाकरे गटाच्या वाट्याला दोन जागा येतील अशी चर्चा पदाधिकाऱ्यांमध्ये सुरु आहे. कोथरूडची जागा ठाकरे गटाला जाणार हे जवळपास निश्‍चित आहे, तर हडपसर येथे शरद पवार गट आणि ठाकरे गटात रस्सीखेच असणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मोकाटे, बाबर यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने त्यास महत्वप्राप्त झाले आहे.

या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना चंद्रकांत मोकाटे म्हणाले, ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघात चांगलं काम केल्यामुळे साहेबांनी भेटायला बोलावलं होत. कोथरूड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद जास्त आहे. तेथून मी निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. सर्वजण ताकदीने काम करतील.

महादेव बाबर म्हणाले,‘‘ लोकसभेला पुणे जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं आहे, त्याच पार्श्‍वभूमीवर आज पवार साहेबांची भेट घेतली. आमची विधानसभेची तयारी कायम सुरु असते, त्यामुळे निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. जागा वाटपात हडपसरची जागा कोणाकडे असणार हे निश्चित झालेले नसले तरी ही जागा आमच्याकडे असावी, असे वाटते. अन्य कोणी निवडणुकीसाठी इच्छुक असेल तर ते चुकीचे नाही. जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार असले, त्यास त्यास निवडून आणले जाईल.