पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव, नाट्यमय घडामोडीनंतर धक्कादायक निकाल!

बीड, ४ जून २०२४ ः बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आहे. शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी ७ हजार मतांनी त्यांचा पराभव केला. बीडमधील पराभव हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जातो आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.

बीडमध्ये यंदा चुरशीची लढत बघायला मिळाली. कधी पंकजा मुंडे आघाडीवर होत्या, तर कधी बजरंग सोनवणे पुढे जात होते. अखेर शेवटच्या ३२ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली. महत्त्वाचे म्हणजे २४ व्या फेरी अखेर भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्याकडे ३० हजार ४६१ मतांची आघाडी होती. मात्र, २५ व्या फेरीपासून या आघाडीत घट होत गेली.

दरम्यान, २८ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी ९३२ मतांची आघाडी घेतली होती. तसेच २९ व्या फेरीत १ हजार २१७ मतांची, तर ३०व्या फेरीत २६०२ मतांची आघाडी घेतली होती. मात्र, ३१ व्या फेरीत पंकजा मुंडे यांना पुन्हा ४०० मतांची आघाडी मिळाली. मात्र, मुंडे फेरमतमोजणीची मागणी केल्यानंतर झालेल्या मतमोजणीत बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली, त्यांनी ७ हजार मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.

यासंदर्भात बोलताना, ही निवडणूक सोपी नक्कीच नव्हती. मात्र, एवढी चुरशीची होईल, असं वाटलं नव्हतं. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली होती. तसेच निकाल काहीही लागो कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केले होते.