धक्कादायक निकाल; उत्तर पश्चिम लोकसभेत रवींद्र वायकर ४८ मतांनी विजयी

मुंबई, ४ जून २०२४: मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभेचा धक्कादायक निकाल समोर आला आहे. शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांना आधी ४८ मतांनी विजयी झाल्याचे जाहीर केले होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणीच्या २६ फेऱ्या झाल्या, तसेच टपाल मतांची मोजणी झाल्यानंतर अमोल गजानन किर्तीकर यांना ४ लाख ५२ हजार ५९६ मते मिळाली, तर रवींद्र वायकर यांना 4 लाख ५२ हजार ६४४ मते मिळाली. मात्र अमोल किर्तीकर यांनी पुन्हा मतमोजणीची मागणी केली, ज्यामध्ये अमोल किर्तीकर एका मताने पुढे असल्याचे सांगण्यात आले. पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर अखेर ४८ मतांनी रवींद्र वायकर यांचा विजय घोषित करण्यात आला.

उत्तर पश्चिम लोकसभेची मतमोजणी गोरेगावच्या नेस्को मैदानात सुरू आहे. याठिकाणी आता दोन्ही बाजूच्या शिवसैनिकांची गर्दी जमू लागली आहे. अमोल किर्तीकर हे फेरमतमोजणीची मागणी करत आहेत. मतमोजणीत छेडछाड झाल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत आहे. गर्दी वाढू लागल्यामुळे पोलिसांकडून याठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत चर्चेतला मतदारसंघ ठरला होता. अमोल किर्तीकर यांना उमेदवारी देण्यावरून काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आक्षेप घेतला. किर्तीकर यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप करून संजय निरुपम यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केला. तसेच उत्तर पश्चिम लोकसभेत उमेदवार देण्यावरून शिंदे गटाने बराच वेळ घेतला. अखेर रवींद्र वायकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले.

दरम्यान रवींद्र वायकर यांना शिंदे गटात प्रवेश करायचा नव्हता, असे त्यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. “मला चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गोवण्यात आले होते. तुरुंगात जाणे किंवा पक्ष बदलणे, हे दोनच पर्याय माझ्याकडे शिल्लक होते. त्यामुळे जड अंतःकरणाने मी पक्ष बदलला. माझ्यावर तर दबाव होताच, पण माझ्या पत्नीचेही नाव गोवल्यांतर माझ्यापुढे पर्याय उरला नाही”, अशी भूमिका वायकर यांनी मांडली होती.