एक्झिट पोलची भाजपला पसंती, मोदी तिसऱ्यांदा होणार पंतप्रधान

मुंबई, १ जून २०२४: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. यानंतर लगेचच विविध संस्थांचे एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. या एक्झिट पोलमध्ये देशात एनडीए आघाडी हॅटट्रीक करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वतील एनडीएने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली.

मात्र इंडिया आघाडीनं कडवं आव्हान दिलं. त्याचा फटका भाजपला बसणार असल्याचं या एक्झिट पोलमधून समोर आलं आहे. एबीपी सी व्होटर सर्वेनुसार तेलंगाणात एनडीए आघाडीला ७ ते ९  जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एनडीटीव्हीने देशात पुन्हा मोदी सरकार येईल पण चारशे पारचं त्यांचं स्वप्न पूर्ण होणार नाही,  असा अंदाज व्यक्त केला आहे.

जन की बातच्या सर्वेनुसार भाजप नेतृत्वातील एनडी आघाडीला ३७७ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला १५१ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मॅट्रीज संस्थेच्या अंदाजानुसार एनडीए आघाडीला ३५३ ते ३६८ जागा तर इंडिया आघाडीला १८८ ते १३३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एबीपी-सीव्होटरनुसार कर्नाटकात भाजप पुन्हा मुसंडी मारणार आहे. या राज्यात एनडीए आघाडीला २३ ते २५ जागा मिळतील आणि इंडिया आघाडीला ३ ते ५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रिपब्लिक भारतनुसार एनडीए आघाडीला ३५३ ते ३६८ जागा मिळतील तर इंडिया आघाडीला ११८ ते १३३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अन्य पक्षांना ४३ ते ४८ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

बिहारमध्ये पुन्हा एनडीएचा बोलबाला

रिपब्लिक भारतनुसार बिहार राज्यात एनडीए आघाडी कमाल करणार असल्याचे दिसत आहे. ४० जागा असलेल्या या राज्यात भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडीला ३१ ते ३७ जागा मिळतील असा अंदाज आहे तर इंडिया आघाडीला २ ते ७ जागा मिळतील अशी शक्यता आहे. आंध्र प्रदेशात एनडीएला ५२ टक्के, इंडिया आघाडीला ३ टक्के, वायएसआरसीपीला ४२ टक्के आणि अन्य पक्षांना दोन टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर देशात सात टप्प्यात मतदान घेण्यात आल. आज शनिवारी मतदानाचा अखेरचा टप्पा होता. या टप्प्यातील मतदान सायंकाळी सहा वाजता संपलं. त्यानंतर थोड्याच वेळात एक्झिट पोलचे आकडे जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेतृत्वातील एनडीए आघाडी पुन्हा चांगली कामगिरी करताना दिसत आहे तर विरोधी इंडिया आघाडीही जोरदार टक्कर देताना दिसत आहे.