अग्रवालच्या मुलाला वाचविण्यासाठी मंत्र्याचा पोलिसांना फोन – प्रकाश आंबेडकर यांचा दावा

मुंबई, ३० मे २०२४: कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने दोघांचा बळी घेतल्यानंतर अपघाताच्या रात्री पोलिसांना कोणत्या तरी मंत्र्याने फोन केला होता, अशी माहिती आमच्या कानावर आली आहे. विशाल अग्रवाल (अल्पवयीन आरोपीचे वडील) या बांधकाम व्यवसायिकाची कोणकोणत्या राजकीय पक्षांबरोबर भागीदारी आहे? कोणकोणत्या मंत्र्यांचे त्याच्या कंपनीत पैसे गुंतलेले आहेत? कोणकोणत्या नेत्यांबरोबर त्याचे हितसंबंध आहेत? याची चौकशी व्हायला हवी. ती चौकशी करत असताना अपघाताच्या रात्री त्याने कोणत्या मंत्र्यांना फोन केला होता हे तपासायला हवं.

पुण्यातील पोर्श कार अपघात प्रकरणात आता अनेक नवी नावं समोर येऊ लागली आहेत. अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील आणि आजोबांपाठोपाठ पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं आहे. अल्पवयीन आरोपीने ज्या बार आणि पबमध्ये मद्यप्राशन केलं. त्या पब, बारचे मालक आणि व्यवस्थापकांवर कारवाई झाली आहे. आता या प्रकरणात काही राजकीय नेत्यांवर आरोप होऊ लागले आहेत. अजित पवार गटातील आमदार सुनील टिंगरे, अजित पवारांचे विश्वासू तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप होऊ लागले आहेत. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांसह त्यांच्या पक्षावर आरोप केले आहेत. यापाठोपाठ आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीदेखील या अपघात प्रकरणावर भाष्य केलं असून यात राजकीय नेत्यांचाही सहभाग असल्याचं वक्तव्य केलं आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, राज्यात अपघातांचं प्रमाण वाढत आहे आणि अशा बऱ्याच अपघातांमध्ये वाहनांचा चालक अल्पवयीन असल्याचं निदर्शनास आलं आहे. परंतु. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधील आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला फारच कमी शिक्षा देण्याचा नियम आता शिथिल करायला हवा. किमान अशा गंभीर अपघातांच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराला मोठी शिक्षा व्हायलाच हवी. पुण्यात जो अपघात झाला ते प्रकरण गंभीर आहे. प्रसारमाध्यमांना या प्रकरणाचं गांभीर्य समजलं असून त्यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला आहे. परंतु, न्यायालयाने या प्रकरणात अद्याप फारसं गांभीर्य दाखवलेलं दिसत नाही. त्यामुळे मी न्यायालयाला विनंती करतो की हा एक गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे आरोपीविरोधात न्यायालयाने कठोर निर्णय घ्यायला हवेत.

‘वंचित’चे प्रमुख म्हणाले, पुण्यासह महाराष्ट्रात जितके बार, पब किंवा क्लब आहेत त्यांच्या मालकांवर सरकारने एक अट घालायला हवी. १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना या बार आणि पबमध्ये प्रवेश देऊ नये. एखाद्या बारमालकाने, चालकाने एखाद्या मुलाला त्यांच्या बारमध्ये प्रवेश दिला तर त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. तसेच त्याला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठवायला हवी. त्याच्याकडून दहा लाख रुपयांचा दंड वसूल करचला हवा. त्याचा बार चालवण्याचा परवानाही रद्द करायला हवा.