दोघांना चिरडणाऱ्या आरोपीला हायप्रोफाइल ट्रीटमेंट: फडणवीस म्हणाले, पोलिसांवर कारवाई करणार
मुंबई, २० मे २०२४ः पुण्यातल्या कल्याणीनगर परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने पोर्शे कारने तरुण-तरुणीला चिरडलं. या घटनेत तरुणीसह तरुणाचा मुत्यू झाला असून या प्रकरणी अल्पवयीन मुलाला न्यायालयाकडून जामीन देण्यात आलायं. मात्र आता या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाला जामीन जरी मिळाला असला तरी त्याच्याविरोधात अपील दाखल करण्याच्या त्याचबरोबर आरोपीला विशेष वागणूक देणाऱ्या पोलिसांवर देखील कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना याबाबत फोन करून आदेश दिले आहेत. या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना यामध्ये फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्याचबरोबर पोलिसांकडून धनिकाचा मुलगा असल्याने या मुलाला विशेष वागणूक दिली गेल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या आरोपीला या प्रकरणात कोणती विशेष वागणूक दिली गेली का? त्याचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून ते खरे असल्यास तात्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या सूचनाही यावेळी फडणवीस यांनी दिल्या आहेत.
कोणालाच सोडणार नाही, पोलिस आयुक्तांचा इशारा
दरम्यान या प्रकरणी अल्पवयीन मुलाला न्यायालयाकडून जामीन देण्यात आलायं. याविरोधात न्यायालयात पोलिसांकडून याचिका दाखल करण्यात येणार असून अपघात प्रकरणी पब, बार, विना नंबर गाडी देणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, तरुण-तरुणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कोणालाही सोडणार नसल्याचंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय.
अल्पवयीनांना दारु पुरविणाऱ्या सागर चोरडियाविरोधात दोषारोपपत्र
या घटनेनंतर पोलिसांनंतर आता राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील ॲक्शन मोडमध्ये आला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या कोरेगाव पार्कमधील मेरीयट स्वीट्समध्ये ब्लॅक क्लब चालवणाऱ्या पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे सागर चोरडिया यांच्यासह आणखी एका बार मालकाविरोधात दोषारोप पत्र दाखल केले आहे.