शशी थरूर यांनी ही केली शहीद करकरेमच्या मुत्यूच्या चौकशीची मागणी
पुणे, ६ मे २०२४: ‘ शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूप्रकरणी माजी पोलिस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांनी दिलेली माहिती गंभीर आहे. त्यामुळे या प्रकरणाची त्रयस्थ एजन्सी मार्फत चौकशी झाली पाहिजे,’’ अशी मागणी कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी सोमवारी केली.
पुणे लोकसभा मतदार संघातील इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदी यापूर्वी केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी काय झाले आणि २०४७ मध्ये काय होणार यावर बोलण्यापेक्षा आपल्या दहा वर्षांच्या कारर्किदीत काय केले, यावर बोलावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी पंतप्रधान यांना दिला. धंगेकर यांच्यासह माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बागवे, उल्हास पवार, मोहन जोशी, अभय छाजेड, गोपाळ तिवारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या प्रसंगी धंगेकर यांच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन थरूर यांच्या हस्ते करण्यात आले.
शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यू कसाबच्या गोळीने झालेला नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यावर विचारले असता, ते थरूर म्हणाले,‘‘ यामध्ये नेमके तथ्य काय आहे, हे मला माहीत नाही. माजी पोलिस अधिकारी एस.एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकात तसा उल्लेख आला आहे. त्यामुळे हे गंभीर प्रकरण आहे. करकरे आणि माझे चांगले संबंध होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी त्रयस्थ एजन्सीमार्फत झाली पाहिजे. जे काय खरे आहे, ते समोर आले पाहिजे. कसाब याला बिर्याणी दिली जात असल्याचे वक्तव्य भाजपचे सध्या उमेदवार असलेल्या एकाने केले होते. परंतु नंतर त्यांनी त्यावर कबुली दिली आहे. यावरून त्यांची विचारसरणी कोणत्या बाजूने होती,हे स्पष्ट होते. ’’ त्यावेळी केंद्रात आणि राज्यात सरकार होते, त्यावेळी सरकारने चौकशी का केली नाही, या प्रश्नांवर थरूर म्हणाले,‘‘ आमची सत्ता असताना मुश्रीफ यांची हे आरोप केले नव्हते. त्यामुळे आम्ही चौकशी करण्याच्या प्रश्नच येत नाही.’’
देशात पहिल्या दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीच्या बाजूने चांगले वातावरण आहे. त्यामुळे भाजप चारशे पार म्हणत असली, तर प्रत्यक्षात तीनशे देखील जागा भाजपला मिळणार नाही, असा विश्वास व्यक्त करून थरूर म्हणाले,‘‘ कॉंग्रेसच्या संकल्पपत्रात जे म्हटले नाही, त्यावर पंतप्रधान मोदी बोलत आहेत. साठ वर्षांत कॉंग्रेस जे काढून घेतले नाही, ते आता मंगळसूत्र काढून घेतली, असा अप्रचार करीत आहेत. देशातील सर्व संविधानिक संस्था ते मोडीत काढत चालले आहेत. मोदींची गॅरंटी जनतेसाठी नाही, तर स्वत:साठी आणि भाजपसाठीची गॅरंटी आहे. महाराष्ट्रात त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्ष ज्या पद्धतीने फोडले. ते जनतेला पटलेले नाही.त्यामुळे या देशाची लोकशाही वाचवायची असेल, तर सत्तेतून त्यांना बाहेर काढले पाहिजे.’’
कॉंग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी कोण उमेदवार असणार, यावर ते म्हणाले,‘‘ आता इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने लढत आहे. भाजपला सत्तेतून बाहेर काढणे हे लक्ष्य आहे. निवडणूका झाल्यानंतर इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र बसून याबाबतचा निर्णय घेतील.’’