८० वर्षांच्या वडिलांना कोर्टात एकटं जाऊ देणार नाही – सुप्रिया सुळेंचं भावनिक वक्तव्य

बारामती, १३ नोव्हेंबर २०२३: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली आणि फूट पडून शरद पवार गट आणि अजित पवार गटात पक्षावरील मालकीवरून वाद निर्माण झाला. यावर आता केंद्रीय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी हे खटले आणि त्याच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी ८० वर्षांच्या वडिलांना कोर्टात एकटं जाऊ देणार नाही, असं मत व्यक्त केलं. त्या सोमवारी (१३ नोव्हेंबर) एका सभेत बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सगळ्या जबाबदाऱ्या असतात. माणूस सगळं तर करू शकत नाही. मुलं, नवरा, कुटुंब यांच्यासाठी ऑक्टोबरपर्यंत वेळच नाही. मतदारसंघ बघायचा, की पक्षाची कामं बघायची की कोर्टातील खटले बघायचे. शरद पवार स्वतः या कामांसाठी जातात. मात्र, जनाची नाही, पण मनाची तर आहे. ८० वर्षांच्या वडिलांना मी कोर्टात एकटं जाऊन देणार नाही. मतदारसंघातील अर्धा वेळ खटले लढण्यात जात आहे. पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हारेंगे या जितेंगे, बाद में देखेंगे, मगर लढेंगे जरूर. आपल्याकडे म्हणतात कोर्टाची पायरी चढू नये. मात्र, आम्ही चढलो. आता एकदा कोर्टाची पायरी चढल्यावर उतरायचं नाही,” असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, शरद पवार ओबीसी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, शरद पवार गटाकडून या दाव्याचं खंडन करण्यात आलं आहे. शरद पवारांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी हा दावाच मुळात हास्यास्पद असल्याची प्रतिक्रिया दिली.सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तुम्ही त्या कंपनीचं नाव बघितलंय का? हा बालिशपणा चाललाय”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. “हा सगळा प्रकार हास्यास्पद आहे. शरद पवार दहावीला होते, त्यावेळेस इंग्रजीमधून प्रमाणपत्र दिले जात नव्हते. पवार दहावीला होते तेव्हा त्यांचा दाखला इंग्रजीत असू शकतो का? आजकाल खोटी प्रमाणपत्रे बाजारामध्ये सर्रास मिळतात.”