शिंदे शहांमध्ये बंद दाराआड ४० मिनिटे चर्चा; राज्यातील स्थितीवर खलबत

दिल्ली, २३ सप्टेंबर २०२२: शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर दिल्लीत महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या बैठका वाढल्या आहेत.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर दिल्लीत (Delhi) महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांच्या बैठका वाढल्या आहेत.
शिवाय, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वारंवार दिल्ली वारी करताना दिसत आहेत, त्यामुळं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत असून गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली.

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदेंची गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोणत्याही केंद्रीय नेत्यासोबत भेट झाली नव्हती. पण, रात्री (गुरुवार) उशिरा ते अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले. दोघांमध्ये जवळपास 30 ते 40 मिनिटं चर्चा सुरु होती. यावेळी दोघांमध्ये शिवसेनेसोबत (Shiv Sena) असलेला संघर्ष, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, दसरा मेळावा अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे.
मात्र, एकनाथ शिंदेंनी ही सदिच्छा भेट होती, असं स्पष्ट केलं. शिवसेनेचे 13 राज्यांतील प्रमुख मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात सामील झाल्याच्या निमित्त बुधवारी महाराष्ट्र सदनामध्ये जंगी कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम संपल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे मुंबईला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण, त्यांचा गुरुवारीही दिल्लीत मुक्काम होता. गुरुवारी संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांची एकाही केंद्रीय मंत्र्याची भेट झाली नसल्याने चर्चा रंगली होती. परंतु, एकनाथ शिंदेंनी ट्वीट करत अमित शाह यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतल्याचं म्हटलंय.