कुटुंबाला नाही तर देशाला वाचविण्यासाठी २६ पक्ष एकत्र, पुढची बैठक मुंबईत – उद्धव ठाकरेंची घोषणा
बेंगलोर, १८ जुलै २०२३: विरोधी पक्षांची आज बंगळुरुत बैठक पार पडली. या बैठकीत देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र जमले होते. महाराष्ट्रातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीला उपस्थित होते. हा देश आमचं कुटुंब आहे, त्याला वाचवण्यासाठी आम्ही आलो असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, देशाला वाचवण्यासाठी हा लढा आहे. वेगवेगळ्या विचारांचे पक्ष असलो तरी एकत्र आलो आहोत. वेगवेगळे विचार असणे हीच लोकशाही आहे. आमचे वेगळे विचार असले तरी एक आलो आहोत. त्याला काही कारणं आहेत. काहींना वाटतं की आम्ही आमचा पक्ष, कुटुंब वाचवायला आलो आहोत. हा देश आमच्यासाठी कुटुंब आहे. आम्ही देश वाचवायला आलो आहोत. आम्ही एका व्यक्तीविरोधात नाही. आम्ही हुकूमशाही प्रवृत्तीच्या विरोधात आहोत, त्यांच्या धोरणाविरोधात आहोत. देशातील नागरिकांमध्ये भवितव्याबद्दल चिंता आहे. देशातील लोकांना आम्ही विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही चिंता करू नका आम्ही आहोत, असेही ठाकरे यांनी म्हटले. विरोधी पक्षांच्या आघाडीची पुढील बैठक मुंबईत होणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी जाहीर केले.
भाजपविरोधात मंगळवारी बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली. बैठकीत २६ पक्षांनी मिळून इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया) या नावाने युती करण्याची घोषणा केली आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आमची एकजूट पाहून पंतप्रधान मोदींनी ३० पक्षांची बैठक बोलावली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आमची एकजूट पाहून मोदीजींनी ३० पक्षांची बैठक बोलावली आहे. आधी ते त्यांच्या युतीबद्दल बोललेही नाहीत, त्यांच्याकडे एका पक्षाचे अनेक तुकडे झाले आहेत आणि आता मोदीजी ते तुकडे एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही पुन्हा महाराष्ट्रातील मुंबईत भेटणार आहोत. तेथे समन्वयकांच्या नावांवर चर्चा करून त्यांची नावे जाहीर करू. लवकरच मुंबई सभेची तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
अरविंद केजरीवाल म्हणाले, २६ पक्ष एकत्र आले आहेत, ही दुसरी बैठक होती आणि आघाडी वाढत आहे ही चांगली गोष्ट आहे. एकीकडे देशाला द्वेषापासून वाचवायचे आहे आणि दुसरीकडे नव्या भारताचे स्वप्न घेऊन आपण सगळे एकत्र आलो आहोत.
काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, ही लढत विरोधक आणि भाजपमधील नाही. हा लढा देशासाठी आहे. म्हणून इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (इंडिया) हे नाव निवडण्यात आले. देशाचा आवाज चिरडला जात आहे, हा लढा देशासाठी आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप