महारेराच्या सलोखा मंचांनी केला 1343 तक्रारींचा निपटारा, सध्या 876 तक्रारींची सलोखा मंचांपुढे सुनावणीची प्रक्रिया सुरू
मुंबई, दिनांक 1 डिसेंबर 2023: महारेराने घर खरेदीदारांच्या तक्रारी लवकरात लवकर सोडविण्यासाठी गठीत केलेल्या सलोखा मंचांनी ( Conciliation Bench)
राज्यातील 1343 घर खरेदीदारांच्या तक्रारी यशस्वीपणे निकाली काढल्या आहेत. महारेराकडे नोंदवलेल्या तक्रारींची सेवाज्येष्ठता आणि हक्क अबाधित राहत असल्याने तक्रारदारांचा सलोखा मंचला वाढता प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच सध्या राज्यात 52 सलोखा मंचांकडे 876 प्रकरणांची सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. मुंबई, पुणे ,नाशिक, नागपूर अशा अनेक ठिकाणी हे मंच कार्यरत आहेत.
महारेराकडे येणाऱ्या घर खरेदीदारांच्या तक्रारींबाबत महारेराच्या पातळीवर नियमितपणे सुनावण्या होत असतात . या तक्रारदारांना पहिल्या सुनावणीच्या वेळी , त्यांचे सर्व हक्क अबाधित ठेवून, सलोखा मंचचा पर्याय सुचवला जातो.
तक्रारदारांच्या संमती नंतर त्यांची तक्रार या मंचाकडे पाठविण्यात येते.
या सलोखा मंचांमध्ये ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी, विकासकांच्या स्वयंविनियामक संस्थांचे प्रतिनिधी आणि खुद्द तक्रारदार असतात. ग्राहक संघटना आणि स्वयंविनियामक संस्थांचे प्रतिनिधी हे या क्षेत्रातील ज्येष्ठ आणि तज्ञ असतात. ग्राहकाला हवी असल्यास वकिलाचीही मदत घेता येते.
सलोखा मंचला 60 दिवसांत आणि अपवादात्मक स्थितीत 90 दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक असते.
तक्रारदार आणि प्रतिवादी यांनी समेटाच्या अटी, शर्ती तरतुदी मान्य केल्या तरच समेट होतो. सर्व घटकांनी मान्य केलेला समेट यशस्वी अहवाल ( Conciliation Success Report) महारेरा तातडीने सुनावणीसाठी घेऊन त्याबाबत आदेश देते . समेटातील तरतुदींची पूर्तता होत नसेल तर संबंधित तक्रारदाराला पुन्हा महारेराकडे दाद मागता येते. कारण तक्रारदाराने संमती दिल्याशिवाय महारेरा कडील तक्रार रद्द होत नाही. तक्रारीची सेवाजेष्ठता ही कायम राहते. महारेरा तक्रारीच्या मूळ सेवाजेष्ठता क्रमानुसार आणि गुणवत्तेनुसार ती तक्रार सुनावणीसाठी घेते.
या सर्व बाबी ग्राहककेंद्रीत आणि ग्राहक हिताच्या असल्याने सलोखा मंचला तक्रारदारांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.