पुणे: सत्तांतरानंतर भाजपमध्ये इनकमिंग सुरू; अजित पवारांची विश्वासू नगरसेविका भाजपमध्ये

पुणे, ९ ऑगस्ट २०२२: विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या कट्टर समर्थक व विश्वासू नगरसेविका रेखा टिंगरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. एक टर्म कॉंग्रेस व दोन टर्म राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नगरसेविका झालेल्या टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरे यांनी विधानसभा निवडणुकीच्यावेळी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत टिंगरे पुन्हा राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. याच काळात सत्तांतर झाले.

 

शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. परिणामी टिंगरे यांच्या पत्नी माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनीच आज भाजपात प्रवेश केला.

 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते त्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या सोयीची प्रभाग रचना करून घेतल्याचा आरोप करण्यात आला.त्यामुळे भाजपात असलेले अनेकजण राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. अनेकांनी तशी तयारी केली होती. मात्र, राज्यात पुन्हा सत्तापालट झाली. भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. त्यामुळे भाजपा सोडून राष्ट्रवादीत जाणाऱ्या अनेकांनी आपला पक्षांतराचा बेत रद्द केला आहे.

 

राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्या भाजपाच्या माजी नगरसेवकांची आपल्याकडे मोठी यादी आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुमारे दोन महिनयांपूर्वी जाहीर केले होते. सुमारे २५-३० माजी नगरसेवकांची ही यादी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, राज्यात सत्तापालट झाल्याने आता भाजपाकडे येणाऱ्या माजी नगरसेवकांची संख्या वाढणार आहे.

 

मुंबई वगळता पुण्यासह राज्यातील सर्वच महानगरपालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना राज्य सरकारने अंतीम केली होती. त्यानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण करून आरक्षण जाहीर करण्यात आले होते. राज्यात सत्तापालकट होताच चार सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केला. त्यासाठी सारी प्रक्रिया आता नव्याने पार पाडावी लागणार आहे. त्यामुळे आता नव्याने प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यावेळी राज्यातील परिस्थिती काय असेल त्यावर नगरसेवकांचे निर्णय अवलंबून राहणार आहेत. मात्र, आजतरी भाजपात येणाऱ्यांचा ओघ वाढणार हे स्पष्ट दिसत आहे.