पुणेकर नागरिकांच्या सहकार्याने जी-२० बैठक यशस्वी करू: पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही
पुणे दि ९/०५/२०२३: जानेवारी महिन्यात झालेल्या जी-२० ‘इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप’च्या बैठकीचे यजमान पद पुण्याने यशस्वीपणे भूषविल्याने जूनमध्ये तिसरी ‘डिजिटल इकॉनॉमी वर्किंग ग्रुप’ बैठक आणि चौथी ‘एज्युकेशन वर्किंग ग्रुप’ बैठक अशा दोन्ही बैठकांचे पुणेकर नागरिकांच्या सहकार्याने यशस्वी नियोजन करू, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली.
चौथ्या जी-२० ‘एज्युकेशन वर्किंग ग्रुप’ बैठकीच्या नियोजनाच्या अनुषंगाने पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी केंद्रीय शिक्षण विभागाच्या सहसचिव निता प्रसाद, अर्चना शर्मा, जी-२० चे समन्वयक विपीन कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कारभारी काळे, प्रा. प्रफुल्ल पवार, रवी शिंगणपूरकर, प्र-कुलगुरू संजीव सोनावणे यांच्यासह पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, पुण्याने गेल्या दोन जी-२० बैठकांचे यजमानपद यशस्वीपणे भूषविल्याने, देशातील चौथ्या बैठकीचे यजमानपद पुण्याला मिळाले, ही सर्व पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे. पुणे हे सांस्कृतिक राजधानीचे शहर आहे. त्यामुळे इथल्या सांस्कृतिक परंपरेचा वैभवशाली वारसा संपूर्ण जगाला दाखविण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. त्यामुळे चौथ्या जी-२० परिषदेच्या नियोजनात पुणेकर कुठेही कमी पडणार नाहीत.
पुण्यात होणाऱ्या जी-२० च्या चौथ्या बैठकीत नागरिकांच्या सहभागावर सर्वाधिक भर आहे. पुण्यात होणाऱ्या बैठकीत शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी व्यापक विचार मंथन होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला जी-२० शी जोडण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनीही यात सहकार्य करावे असे आवाहन श्रीमती प्रसाद यांनी केले.
पुण्याची ओळख ही संपूर्ण जगात ‘अशिया खंडातील ऑक्सफर्ड’ म्हणून गणलं जातं. त्यामुळे सर्व शैक्षणिक संस्थांचा समावेश करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करु आणि ही बैठक यशस्वी करु, अशी ग्वाही विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी दिली.
बैठकीचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी केले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप