“उद्धव ठाकरेंचा स्वार्थ आणि पुत्रप्रेम युती तोडण्यास जबाबदार” चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्र!
नागपूर, १३ फेब्रुवारी २०२३ :“बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व टिकवण्यासाठी प्रयत्न केले मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व तोडून पाठीत खंजीर खुपसला. आता मात्र त्यांना चूक लक्षात आली आहे, माझी चूक झाली हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, पण आता बोलता येत नसल्याची परिस्थिती आहे. अशा शब्दांमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
“काँग्रेसची विचारधारा स्विकारुन भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसुन युती तोडली. त्यामुळे युती तोडण्याला जवाबदार हे फक्त उध्दव ठाकरे यांचा स्वार्थ आणि पुत्र प्रेम आहे. सावरकरांचा अपमान होत असताना सरकार जाईल म्हणून तोंडाला पट्टी बांधली, आता हिंदुत्ववावर बोलण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही.” असंही बावनकुळे म्हणाले.
याशिवाय, “निवडणुका या लागणारच आहे, ते कोणाच्या हाती नाही. २०२४ च्या लोकसभा विधानसभा निवडणुका होणार आहेत, सुप्रीम कोर्टाच्या निकालनंतर निवडणुका लागणार आहे. आम्ही निवडणुकांना घाबरत नाही, मोदींच्या नेतृत्वात निवडणुका लढवू, उद्धव ठाकरे यांच्या गरळ ओकण्याला जनता धडा शिकवेल, केव्हाही निवडणुका होऊ द्या आम्ही तयार आहोत.”, असंही बावनकुळेंनी सांगितलं.
याचबरोबर, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर कोणीही बोलू नये. जो निकाल येईल तो मान्य करायल पाहिजे. उद्धव ठाकरे हे निकाल लागण्यापूर्वी निकाल लागल्याची भाषा करत आहेत, शिवसेनेचे लोक सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने आला तर योग्य असे म्हणतात विरोधात गेला तर टीका करायला तयार होतात.” असंही बावनकुळेंनी यावेळी म्हटलं.