कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
पुणे, १२ फेब्रुवारी २०२३: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायकांना आज निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश कला क्रीडा स्वारगेट येथे प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी कसबापेठ विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते, उपजिल्हाधिकारी संजय तेली, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ, तहसीलदार शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.
श्री.तेली आणि श्रीमती देवकाते यांनी कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रीयेची सविस्तर माहिती दिली. मतदानाच्यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे कटाक्षाने पालन करावे. ईव्हीएम यंत्राच्या हाताळणीचे योग्य प्रशिक्षण घेऊन मतदानाच्यावेळी दिलेल्या सूचनेनुसारच कार्यवाही करावी. मतदान प्रक्रीयेदरम्यान विविध नमुन्यातील माहिती वेळेवर पाठविण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
प्रशिक्षणाचे ३ टप्पे होणार असून आज पहिला टप्पा पार पडला. सुमारे एक हजार प्रशिक्षणार्थीना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना, विविध शासन निर्णय, निवडणूक प्रक्रियेसंबंधी असलेली नियमावली, निवडणूकीची कार्यपद्धती आणि कार्यप्रणाली, विविध नमुन्यांमध्ये भरावयाची माहिती, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची कर्तव्ये आणि जबाबदारी आदींबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी प्रत्यक्षात मतदान यंत्रांची हाताळणी आणि जोडणी कशा पद्धतीने करावी, मतदान यंत्राबाबत तांत्रिक माहिती, मतदान साहित्याची ओळख, मतदान प्रक्रियेवेळी घ्यावयाची काळजी याचेही ईव्हीम यंत्र हाताळणीद्वारे तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले.
विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप