“देशात फक्त भाजपच्या बाजूचा प्रवाह नाही” – विधानसभा निवडणुकीवर पवारांची प्रतिक्रिया

मुंबई, ८ डिसेंबर २०२२: गुजरात, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत. गुजरात राज्यात पुन्हा एकदा भाजप पक्ष सरस ठरला आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात मतं टाकली आहेत. येथे अगोदर भाजपाची सत्ता होती. दरम्यान, अद्याप पूर्ण निकाल येणे बाकी असले तरी प्राथमिक निकालावरून या दोन्ही राज्यांत कोण सरकार स्थापन करणार हे स्पष्ट झाले आहे. याच निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातची निवडणूक जिंकण्यासाठी केंद्राची पूर्ण ताकद लावण्यात आली. गुजरातमध्ये भाजपाच्या बाजूने निकाल लागला म्हणजे देशात एकाच बाजूने मतप्रवाह जातोय असे नव्हे, असे शरद पवार म्हणाले आहेत.

“काही निवडणुका नुकत्याच पार पडल्या. गुजरातची निवडणूक एकतर्फी होईल, याबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती. देशातील सर्व शक्ती त्या निवडणुकीसाठी वापरली गेली. एका राज्याच्या सोईचे अनेक निर्णय घेतले गेले. अनेक प्रकल्प त्या राज्यामध्येच कसे जातील, याची काळजी घेतली गेली. त्याचा परिणाम हा निवडणूक निकालावर होणारच होता. गुजरातमध्ये तसाच निकाल लागला आहे. मात्र गुजरातचा निकाल भाजपाच्या बाजूने लागला म्हणाजे देशामध्ये लोकांचा एका बाजूने मतप्रवाह जातोय हे खरं नव्हे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीची महापालिका निवडणूक,” असे शरद पवार म्हणाले.
“दिल्ली महापालिकेची सूत्रं अगोदर भाजपकडे होती. आता येथे आम आदमी पार्टीची सत्ता आली. हिमाचल प्रदेशमध्ये अगोदर भाजपाची सत्ता होती. आताच्या माहितीनुसार येथे भाजपाला २७ जागा मिळाल्या. काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या आहेत. येथील भाजपाचे राज्य गेले. दिल्लीमध्येही भाजपाची सत्ता गेली. याचा अर्थ हळूहळू बदल होत आहे. राजकारणामध्ये पोकळी असते. गुजरातची पोकळी ही भाजपाने भरून काढली. तर दिल्लीची पोकळी केजरीवाल यांनी भरून काढली. आज लोकांना बदल हवा आहे. मात्र याची नोंद राजकीय कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे,” असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले