मराठा आंदोलन मुख्यमंत्र्यांमुळे तर लाठीमार फडणवीसांमुळे – नाना पटोले यांचा गंभीर आरोप
गडचिरोली, ६ सप्टेंबर २०२३: जालना येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यात नाना पाटोले यांनी उडी घेत हे आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरुन सुरु झाले तर गृहमंत्र्यांनी आदेश दिल्यावर लाठीमार करण्यात आला, असा गंभीर आरोप केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत.
भाजपविरोधात ‘इंडिया’ने मोट बांधली आहे. मंबईत ज्या दिवशी ही बैठक झाली त्याच दिवशी जालन्यात मराठा आरक्षण चिघळवून लक्ष विचलित करण्याचा डाव आखला गेला, पण आता मराठा समाजासह ओबीसींमध्ये रोष वाढत आहे, त्यामुळे हा डाव भाजपच्याच अंगलट आला, अशी टीका पटोले यांनी केली. काँग्रेसच्या वतीने सुरु असलेल्या जनसंवाद पदयात्रेनिमित्त नानाभाऊ पटोले हे ६ सप्टेंबरला शहरात आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, सध्या समाजात भीतीचे वातावरण व प्रचंड अस्वस्थता आहे. तलाठी भरतीसाठी खासगी कंपनी नेमली आहे, त्याआडून लूट सुरु आहे.
२०१४ मध्ये भाजपने मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले व लोकसभा व विधानसभा निवडणुकीत फायदा करुन घेतला, पण नंतर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक वाढवावी व जातनिहाय जनगणना करावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे. ओबीसींच्या वाट्याला जाल तर हात भाजून निघेल, असा इशारा त्यांनी दिला. आता मराठा समाज व ओबीसी बांधव देखील आक्रमक आहेत, त्यामुळे सरकारची कोंडी झाली आहे. भाजपने केंद्र व राज्यातील सत्ता सोडावी आम्ही सगळ्या समाजाला न्याय देऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंड, आनंदराव गेडाम, पेंटारामा तलांडी, समन्वयक नानाभाऊ गावंडे, प्रदेश महासचिव डॉ.नामदेव किरसान, डॉ.नितीन कोडवते, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे आदी उपस्थित होते.
राज्यात साडेसात हजार मुली व महिला गायब आहेत, त्या कुठे आहेत, याचा शोध लागत नाही. गृहमंत्री यावर बोलत नाहीत. भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर पहिली स्वाक्षरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर करु असे आश्वासन दिले होते, पण आज उलट स्थिती आहे. शेतकरी आत्महत्या चारपटीने वाढल्याचा आरोप नानाभाऊ पटोले यांनी केला. राज्य दुष्काळाच्या सावटाखाली असताना १७ जिल्ह्यांना पालकमंत्रीच नाहीत. शासन आपल्या दारीतून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरु आहे. सगळा दिखावा सुरु असल्याची टीका त्यांनी केली.