राज्यपालांची हकालपट्टी न केल्यास महाराष्ट्र पेटून उठेल – शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा

मुंबई, १७ डिसेंबर २०२२: महापुरुषांविषयी करण्यात आलेली वादग्रस्त विधानं, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि राज्यातून बाहेर चाललेले उद्योग या सगळ्याचा निषेध करण्यासाठी आज मुंबईत महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात आला. तर दुसरीकडे या मोर्चाला उत्तर म्हणून भाजपाकडून माफी मांगो आंदोलन केलं गेलं. या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय वातावरण तापलं आहे.

महामोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत हल्लाबोल केला. यावेळी शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची हकालपट्टी करा अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल अशा इशारा दिला.

बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा देशाने पाहिला असेल. जेव्हा ह्या मोर्चाची घोषणा केली, तेव्हा मला काही जणांनी विचारलं तुम्ही चालणार का? मी एकटा नाही, तर माझ्याबरोबर लाखो महाराष्ट्रप्रेमी महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहेत. ज्यांनी ज्यांनी आपल्याला डिवचलं त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच वेळ आहे, असा एल्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे.

या राज्यकर्त्यांमध्ये कर्तृत्वाची किंवा राज्याच्या विकासाची स्पर्धा नसून महाराष्ट्राच्या बदनामीची स्पर्धा सुरू झाली आहे. एका मंत्र्याने उल्लेख केला की शिक्षणासाठी मदत मागितली तर त्याला भीक मागितली असं म्हणाले. तिथे महात्मा फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटलांचा उल्लेख केला. आज लोक शांत आहेत, पण राज्यपालांची हकालपट्टी वेळेत झाली नाही, महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. त्याचं प्रतीक आज इथे दिसतंय. महात्मा फुलेंनी ज्ञानदानाच्या क्षेत्रात मोठं काम केलं. अशा व्यक्तीबाबत टिंगल-टवाळी राज्यपालांकडून होत असेल, तर राज्यपाल म्हणून त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही
महाराष्ट्राच्या इतिहासात असा गव्हर्नर कधी पाहिला नाही. मी स्वत: राज्याच्या विधानभवनात जाऊन ५५ वर्षं झाली. या काळात मी अनेक राज्यपाल पाहिले. महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवण्याचं काम यांनी केलं. पण यावेळी राज्याच्या विचारधारेला संकटात आणण्याचं काम होत आहे. महात्मा फुले, सावित्रीबाईंबद्दल लाजिरवाणे उद्गार काढतात. त्यांना शरम वाटली पाहिजे. या इशाऱ्यातून राज्यकर्त्यांनी बोध घेतला नाही, तर लोकशाहीच्या मैदानात त्यांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, याबद्दलची खात्री मला आहे.

हे खरं आहे की आजचा मोर्चा एक वेगळी स्थिती दाखवतो. ७० वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावर मुंबईत लाखोंचे मोर्चे निघाले. मराठी भाषिकांचं राज्य व्हावं, यासाठी हौतात्म्य पत्करायला अनेक तरुण पुढे आले. शेवटी महाराष्ट्र पदरात पडला. पण तरीही अजूनही महाराष्ट्रात बाहेरचे मराठी भाषिक येण्याचा आग्रह करत आहेत. बेळगाव, निपाणी, कारवार किंवा अन्य भागाचा महाराष्ट्रात समावेश व्हावा, यासाठी त्यांच्या भावनेशी राज्यातला मराठी माणूस सहभागी आहे, अशी टीकाही पवार यांनी केली.