रोहित पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत पत्र
नागपूर, १० ऑगस्ट २०२३: राज्यातील सरळसेवा भरतीवरून सध्या राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. पावसाळी अधिवेशनातही परीक्षा शुल्क आणि पेपरफुटीचा मुद्दा चांगलाच गाजला. यावेळी आमदार रोहित पवार यांनी परीक्षा शुल्काच्या वाढीवरून सरकारला प्रश्न केला असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सिरीयस’ विद्यार्थी परीक्षेत यावे म्हणून शुल्कवाढ केल्याची माहिती सभागृहात दिली. स्पर्धा परीक्षार्थींमधून याचा निषेध सुरू आहे. त्यात आता रोहित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून फडणवीस यांना खरमरीत पत्र लिहून एकवेळ जेवणारा, पाठीचा कणा वाकेपर्यंत लायब्ररीत बसणारा विद्यार्थी सिरीयस कसा नाही? असे असंख्य प्रश्न केले. समाज माध्यमावर या पत्राची चांगलीच चर्चा सुरू आहे.
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ वाजेपर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही सिरीयस नाहीत का ? जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो, एकवेळ उपाशी राहतो, तरी तुमच्या मते आम्ही सिरीयस नाहीत का ? खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो, तरी तुमच्या मते आम्ही सिरीयस नाहीत का ? अभ्यासात खंड पडू नये, प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरीदेखील जात नाहीत, तरी तुमच्या मते आम्ही सिरीयस नाहीत का? कधी कधी महागडी पुस्तकं घ्यायला परवडत नाही म्हणून छायांकित प्रत काढून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही सिरीयस नाहीत का? एका जागेसाठी आम्ही हजार हजारजण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही सिरीयस नाहीत का ? सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात, पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही, तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही सिरीयस नाहीत का? जास्त फी भरली म्हणून सिरीयसनेस येत नसतो, तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर सिरीयसनेस येत असतो, हे सरकारनेदेखील सिरीयसनेस दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी सिरीयस आहोत, आता सरकारनेदेखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फीच्या माध्यमातून होत असलेली लूट थांबवण्यासाठी सिरीयस व्हावे.