पुणे: पालकमंत्र्यांच्या घराबाहेर व्हिडिओ काढून व्हायरल करणारा जेरबंद

पुणे, दि. १२/१२/२०२२: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राहत असलेल्या कोथरुड भागातील महात्मा सोसायटीतील देवशिष बंगल्या बाहेरील व्हिडिओ काढून क्लीप तयार करीत फेसबुकवर व्हायरल केल्याप्रकरणी संबंधिताला पोलीसांनी अटक केले आहे.

संदीप कुदळे (रा.पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनोळखी महिलेवर ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोथरुड आणि वारजे पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील राहत असलेल्या देवशीष बंगल्यावर पोलीस हवालदार सचिन सोनवणे नेमणुकीस होते. त्यावेळी आरोपी संदीप आणि एक महिला त्याठिकाणी आल्या होत्या. त्यामुळे हवालदाराने त्यांना ‘आपण कोण आहे, येथे कशासाठी आला अहात, आपले काय काम आहे’ अशी विचारणा केली. ‘तुम्ही येथे थांबू नका, ही थांबण्याची जागा नाही, असे सांगितले. त्यावेळी संदीपने मी येथून जाणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, ही जागा तुमची नाही, असे उलट बोलून व्हिडिओ क्लीप तयार केली.

दरम्यान, आरोपी संदीप कुदळे याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यानावाने फेसबुक पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसारित करुन बदनामी केली. त्याशिवाय अतिशिय अश्लाघ्य भाषेत कमेंट केली. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल बबनराव हिंगणे (वय-४५) यांनी वारजे ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.