पुणेवाल्यांनो चिंचवडला प्रचाराला येऊ नका अजित पवार यांचे आदेश

पुणे, १० फेब्रुवारी २०२३ : कष्ट, मेहनत व सचोटीने काम केल्यास यश निश्‍चित मिळणार आहे. हे प्रत्येक कार्यकर्त्याने लक्षात घेऊन एकजूटीने झोकून देवून चिंचवड व कसबा या दोन्ही मतदार संघाच्या पोटनिवडणूका जिंकण्यासाठी काम करावे. सहानुभूतीवर नव्हे तर विकासावर ही निवडणूक लढवायची आहे. कोणत्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता व प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे काम करावे, अशा सूचना राष्ट्रीवादी कॉंग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रचारासाठी चिंचवडला जावे पण कसब्याकडेही दुर्लक्ष करुन नका असा सल्लाही पवार यांनी दिला आहे.
पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकार्िरणीची बैठक पुण्यात झाली. त्यात ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, माजी आमदार जयदेव गायकवाड, कमल ढोले पाटील, प्रदीप गारटकर, अजित गव्हाणे, अंकुश काकडे, दीपक मानकर, रवींद्र माळवदकर, अण्णा थोरात, सुभाष जगताप, राजलक्ष्मी भोसले, दत्तात्रय धनकवडे, बाबुराव चांदेरे, दीपाली धुमाळ, प्रिया गदादे, प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.
सर्व सामान्यांचे सरकार म्हणत असलेले शिंदे-फडणवीस सरकार महागाई, बेरोजगारी आटोक्‍यात आणण्यासाठी अपयशी ठरले आहे. निवडणूक आयोग, न्यायालयाने कोणतीही मान्यता न दिल्यामुळे हे सरकार घटनाबाह्यच आहे. या सरकार विरुध्द नाराजी असल्यामुळे नुकत्यात झालेल्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत त्यांचा दारुण पराभव झाला आहे. आता विधानसभेच्या चिंचवड व कसबा या दोन्ही मतदार संघाच्या निवडणूका गद्दार सरकारच्या त्यांची जागा दाखवून देण्यासाठी महत्वाची ठरणार आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याकडे दुर्लक्ष करत ठराविक उद्योगपती व त्यांच्या घराण्याचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले, असे म्हणत पवार यांनी केंद्र शासनावरही टिका केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या तयारीच्या दृष्टीने चिंचवड व कसब्याची पोटनिवडणूक महत्वाची ठरणार आहे. “कमळाबाई’ काहीही करुन शकतात त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यावी. वेळ कमी व काम जास्त अशी अवस्था असल्याने विजय मिळविण्यासाठी कुठेही कमी पडू नका, अशा सूचनाही पवार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
————-
नागरिकांशी कडक भाषेत बोलू नका
चौकट – महाविकास आघाडीच्या मतांची विभागणी होवू देवू नका. यासाठी अधिकची मते मिळविण्यासाठी प्रयत्न करावा. मात्र हे करत असताना नागरिकांशी कडक शब्दात बोलू नका. अजित पवारांसारखे कडक भाषेत बोलू नका. शरद पवार साहेब कसे समजून सांगतात याप्रमाणे नागरिकांना समजून सांगावे. नाराजी निर्माण होणार नाही याची दक्षताही बाळगावी, असे अजित पवार म्हणताच सभागृहात कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा हशा पिकला.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप