पुणे: धंगेकर, रासने कोट्याधीश पण शिक्षण कमीच

पुणे,६ फेब्रुवारी २०२३: कसबा पेठ विधानसभेतील महाविकस आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांची संपत्ती किती आहे हे देखील स्पष्ट झालेले आहे धंगेकर आणि त्यांच्या पत्नीकडे एकूण १२ कोटी ९५ लाख ७४ हजार रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. तर हेमंत रासने आणि त्यांच्या पत्नीकडे १४ कोटी ७३ लाख इतकी संपत्ती आहे. धंगेकर आणि रासने दोघेही कट्ट्या देश असले तरी शिक्षण मात्र अत्यल्प आहे. त्यामुळे सुशिक्षित पुण्यातील मतदारसंघात त्यांचा आमदार मात्र तुम्ही शिकलेला असल्याचेच होणार आहे.

धंगेकर आठवी पास अन ९ गुन्हे
धंगेकर यांच्या नावावर ३५ लाख ७३ हजार रुपयांचे कर्ज तर पत्नीच्या नावावर ३२ लाख ८ हजार रुपयांचे कर्ज आहे.
धंगेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत त्यांनी जोडलेल्या शपथपत्रावरून ही माहिती समोर आली आहे.धंगेकर यांचे चालू अर्थिक वर्षातील वार्षिक उत्पन्न 3 लाख 36 हजार इतके आहे. त्यांचा शेती व सोने-चांदी कारागिरी आणि बांधकाम हा व्यवसाय आहे. तसेच यांचे शिक्षण आठवीपर्यंत झाले आहे. धंगेकर यांची जंगम मालमत्ता ४७ लाख ६ हजार १२८ रुपये, तर पत्नीकडे ६८ लाख ६७ हजार ३७६ रुपयांची मालमत्ता आहे. धंगेकर यांची स्थावर मालमत्ता ९ कोटी १९ लाख २७ हजार ९१६ रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे २ कोटी ६० लाख ७२ हजार ९९४ रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. धंगेकर यांच्याकडे दोन दुचाकी, दहा तोळे सोने, तर पत्नीकडे 15 तोळे सोने आहे. धंगेकर यांच्या रविवार पेठ, मंगळवार पेठ, कसबा पेठ आणि शिवाजीनगर येथे सदनिका आहेत. धंगेकर यांची दौंड तालुक्‍यातील पिंपळगाव येथे शेती असून कोथरूड येथे साडेचार हजार चौरस फूटांची बिनशेती जागा आहे. यांच्यावर एकूण नऊ प्रलंबित खटले असल्याची माहिती त्यांनी शपथपत्रात दिली आहे.

रासने १२वी पास, पण बिल्डरांसोबत भागिदार

हेमंत रासने आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे १४ कोटी ७३ लाख ३९ हजार ७२० रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. तर, तीन कोटी ८० लाख ५६ हजार ६७७ रुपयांचे कर्ज रासने आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर आहे.
रासने यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ही माहिती समोर आली आहे. रासने हे बारावी उत्तीर्ण आहेत. ते बांधकाम व्यावसायिक असून श्रीपाद व्हेंचर्स, कीर्तीवर्धन डेव्हलपर्स ॲण्ड बिल्डर्स आणि सिटीस्पेस डेव्हलपर्स एलएलपी मध्ये भागीदार आहेत. व्यवसाय, शेती, भाडे आणि मानधन असा त्यांनी उत्पन्नाचा स्त्रोत दाखविला आहे. रासने यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील गोरड म्हशिवली आणि हवेली तालुक्यातील म्हाळुंगे, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात बोरघर, टाळुसरे येथे जमिनी आहेत. तर, पुणे शहरातील सदाशिव पेठ व बुधवार पेठ येथे सदनिका आहेत. रासने यांच्याकडे ९ कोटी ८१ लाख ४१ हजार ३६२ रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नीच्या नावावर दोन कोटी ८१ लाख १२ हजार ३५७ रुपये किमंतीची जंगम आणि स्थावर मालमत्ता , मुलीच्या नावावर ५४ लाख आठ हजार ४२३ रुपये व मुलाच्या १ कोटी ५६ लाख ५७८ रूपयांची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. अशी एकूण मिळून १४ कोटी ७३ लाख ३९ हजार ७२० रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता रासने कुटूंबियांकडे आहे. रासने आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे ३ कोटी ८० लाख ५६ हजार ६७७ रुपयांचे कर्ज आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप