पंकजा मुंडे पाथर्डी मधून विधानसभा लढविणार? नवीन समीकरणांची चर्चा

नगर, १२ एप्रिल २०२३ :मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी गावात नारळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपा नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे आणि भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे यांनी टीव्ही वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना पक्षाने जबाबदारी दिली तर आगामी विधानसभा निवडणूक पाथर्डीतून लढवणार, अशा आशयाचं विधान त्यांनी केलं. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर आता पंकजा मुंडे परळीतून लढणार की पाथर्डींतून अशी चर्चा रंगू लागली आहे. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

“पंकजा मुंडे पाथर्डीतून लढणार की परळीतून याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. कोणी कोणत्या जागेवरून निवडणूक लढवावी, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाच्या केंद्रीय संसदीय बोर्डाला आहे. त्यामुळे यासंदर्भात मी बोलणं योग्य ठरणार नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

“…म्हणून आरोपपत्रात अजित पवारांचं नाव नसेल

पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्र अजित पवारांचं नाव नसल्याबाबतही भाष्य केलं. “या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान ईडीला अजित पवारांबाबत काहीही आढळलं नसेल, त्यामुळे आरोपपत्रात त्याचं नाव नसेल. त्यामुळे ईडीच्या आरोपपत्रावर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणं बरोबर नाही”, असे ते म्हणाले.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप