निर्मला सीतारमण पुन्हा बारामतीत, पवार कुटुंबाच्या कोंडीचा प्रयत्न
पुणे, १० नोव्हेंबर २०२२: राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारासंघावर २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विशेष लक्ष केंद्रित करत आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा नुकताच बारामती दौरा झाला. यानंतर आता केंद्रीय अन्न प्रक्रिया व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल शुक्रवारपासून (ता. ११) बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. सीतारमण पुन्हा बारामतीचा दौरा करणार असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी पटेल बारामतीला येत आहेत. वारंवार दौरे करून पवार कुटुंबाची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपने सुरू केला आहे ़
भाजपने २०२४ च्या निवडणुकांच्या दृष्टीने बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने या दौऱ्यांकडे राजकीय अर्थाने पाहिले जात आहे. राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लवकरच बारामतीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी पटेल बारामतीत येत आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘‘मागील महिन्यात सीतारमण यांचा बारामतीचा दौरा झाला. यानंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीस पुन्हा एकदा बारामतीच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी पटेल बारामतीला भेट देत आहेत.
दौऱ्याला खडकवासला मतदारसंघापासून सुरू होणार असून, येथे लोकसभा व विधानसभेच्या कोअर टीमची बैठक घेणार आहेत. त्यानंतर भोर मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी व महिला बचत गटाच्या मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत. बारामतीत विधानसभा मतदारसंघात शाखा उद्घाटन, तेथील शहर कार्यालयाला भेट दिल्यानंतर इंदापूर आणि दौंड येथे कार्यकर्ता मेळावा पटेल घेणार आहेत’’, असे शेवाळे यांनी सांगितले.
राष्ट्रवादीची बारामतीतच कोंडी करून, राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांना गुंतवून ठेवून, आगामी राष्ट्रवादीची कोंडी करण्याची भाजपची योजना असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता भाजप नेत्यांचा बारामतीत वारंवार दौरा होणार असल्याची, माहिती मिळत आहे.