कारण नसताना माझी बदनामी: अजित पवार

पुणे, ११ नोव्हेंबर २०२२ः सहा महिन्यापूर्वीच मी तिकीट काढलं होते. त्यामुळे मी बाहेर होतो. मी नाराज असल्याची अफवा पसरली आहे, मी पाच दिवस आजारी होतो. कारण नसताना माझी बदनामी केली जाते,” अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली ़

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. परंतु विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र यावर भाष्य न केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात होते. त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार मावळ येथे बोलत होते. ते आठ दिवसानंतर आज जाहीर कार्यक्रमास उपस्थित होते.

“अजित पवार हे त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी दूर गेले आहेत,” असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच सांगितले होते. त्यानंतर आठ दिवसांनी आज अजितदादा एका कार्यक्रमास उपस्थित होते. तेव्हा त्यांनी यावर भाष्य केलं.

अजित पवार म्हणाले, “सहा महिन्यापूर्वीच मी तिकीट काढलं होते. त्यामुळे मी बाहेर होतो. मी नाराज असल्याची अफवा पसरली आहे, मी पाच दिवस आजारी होतो. कारण नसताना माझी बदनामी केली जाते,”

अब्दुल सत्तार यांनी सोमवारी (7 नोव्हेंबर) एका वृत्तवाहिनीशी बोलताना ऑन कॅमेरा सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केली होती.या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत मुंबई, रायगड, औरंगाबाद, पुणे, नाशिकसह राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केली.

मुंबईतील सत्तार यांच्या सरकारी बंगल्यासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत घराच्या काचा फोडल्याचं समोर आलं. तर दुसरीकडे, राज्य महिला आयोगाने पोलीस महासंचालकांना पत्र लिहून सत्तार यांच्या विधानाप्रकरणी अहवाल सादर करावा, अशी सूचना केली.

यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली. यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मंगळवारी (8 नोव्हेंबर) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.