महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये; बावनकुळे यांचे सुतोवाच

पिंपरी, ८ मे २०२३: महापालिका निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता असल्याचे सुतोवाच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. त्या अनुषंगाने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षातर्फे युवा वॉरिअर्स शाखेचे उद्घाटन निगडी प्राधिकरणात झाले. त्यानंतर कार्यकर्ता मेळावा झाला. त्यात त्यांनी महापालिकेच्या लांबणीवर पडलेल्या निवडणुकांबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ”आता पावसाळा जवळ आला आहे. महापालिका निवडणुका घेण्यासाठी पुरेसा वेळ नाही. आगामी निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांंच्या उमेदवारांची अनामत रक्कम जमा होईल, अशा पद्धतीने निवडणुकीची तयारी करायची आहे. त्यासाठी प्रत्येक घरापर्यंत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पोहचले पाहिजे. पक्षाचे सरल ॲप किती जणांपर्यंत पोहचवले, त्यावरून तिकिट देण्याचा निर्णय घेतला जाईल.” सरल ॲप किमान ६० हजार कुटुंबांपर्यंत पोहचून ते डाऊनलोड करून घेणे. दोन्ही आमदारांनी हे टार्गेट पूर्ण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपचे बहुमतातील सरकार कर्नाटकमध्ये येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शहराध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरू
भाजपच्या शहराध्यक्ष बदलाबाबत पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, पिंपरी-चिंचवडच शहराध्यक्ष आणि राज्यातील ७५ जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी पक्षाचे निरीक्षक संबंधित शहर, जिल्ह्यांमध्ये जात आहेत. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निरीक्षक वरिष्ठांकडे अहवाल सादर करणार. त्यानंतर शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय होईल.

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप