जितेॆद्र आव्हाड यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत
ठाणे, १२ नोव्हेंबर २०२२ : ठाण्यातील चित्रपटगृहात धुडगूस घालून प्रेक्षकांना मारहाण करत “हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना शुक्रवारी ठाणे पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आव्हाडांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. काल आणि आज हजारोंच्या संख्येंने कार्यकर्ते वर्तकनगर पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. आव्हाडाच्या अटकेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आव्हाडाची अटक बेकायदा आहे, असे आव्हाडांच्या वकीलांनी सांगितले. आव्हाडांना जेल की बेल होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. यावेळी न्यायालयाच्या बाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजी केली.
तो चाणक्य कोण?
पोलिसांनी आव्हाडांना न्यायालयात आणले तेव्हा नातेवाईकांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. “पोलिसांवर दबाब आणण्यासाठी चाणक्याकडून शंभर फोन येत होते,” असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला आहे.
“माझ्यावर कारवाईसाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे,”असे आव्हाड म्हणाले. आव्हाडांवर न्यायालयात आणले तेव्हा न्यायालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सध्या या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरु आहे.
आव्हाडांच्या विरोधात कलम ३२३ आणि कलम ५०४ लावण्यात आले. आव्हाड यांना रात्री उशिरा वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. वर्तकनगर ठाण्यात रात्री आव्हाडांचा मुक्काम होता. आव्हाड यांच्यासह त्यांच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
७ नोव्हेंबर रोजी रात्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह १०० कार्यकर्ते ठाण्यातील विवियन मॉल येथे घुसले. या वेळी त्यांनी “हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो बंद पाडला. तसेच त्यांना विरोध करणाऱ्या काही जणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोफत शोचे आयोजन केले. त्यानंतर हा वाद वाढतच गेला.
“आमची इच्छा आहे की, महाराष्ट्रात विकृती जाऊ नये. बाजीप्रभू देशपांडे शिवाजी महाराजांविरोधात लढले हे चित्रपटात दाखवले हे चूक आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम करण्याचे काम सुरू असून विकृत इतिहास दाखवला जात आहे. मला फाशीवर दिले तरी माफी मागणार नाही,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
आव्हाडांच्या अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आम्हा सर्वांना या कामासाठी जेलमध्ये जावे लागले तरी चालेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. आव्हाड यांना अटक करणे म्हणजे राज्यात ब्रिटिशराज आले आहे.”