चंद्रकांत पाटील यांच्या तोंडावर शाई फेकली

चिंचवड, १० डिसेंबर २०२२ : चिंचवड येथील मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.

पाटील यांनी सोमवारी पैठण येथे एका कार्यक्रमात बोलताना कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात पाटील मंगळवारी आले आहेत. चिंचवडमधील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी समाधी महोत्सव आजपासून सुरु होत आहे. त्याचे उद्घघाटन पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचे संयोजकांनी गुरुवारी जाहीर केले होते. दरम्यान, पाटील यांनी पैठण येथे केलेल्या वादग्रस्त केल्याने उद्घाटन कार्यक्रमस्थळी तणाव होता. ‘पाटील यांना शहरात पाउल ठेवू देणार नाही’, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी प्रचंड पोलिस बंदोबस्त होता.

पाटील सायंकाळी पाचच्या सुमारास मंदिर परिसरात आले. उद्घाटन कार्यक्रमाला जाण्यापूर्वी भाजपचे कार्यकर्ते मोरेश्वर शेंडगे यांच्या घरी चहापानासाठी थांबले. यानंतर सहाच्या सुमारास घरातून बाहेर पडल्यावर काही क्षणात अज्ञाताने त्यांच्या अंगावर शाई फेकली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. पोलिसांची धावपळ उडाली. पाटील यांना पुन्हा शेडगे यांच्या घरी नेले.

चिंचवड
महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्त्यव्य केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चिंचवड येथील मंदिरासमोर निदर्शने केली. चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. दरम्यान या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले आहे.