अफजल खानाच्या कबरीच्या अतिक्रमणाबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे महत्वाचे वक्तव्य
नागपूर, १२ नोव्हेंबर २०२२: अफजल खानच्या कबरीजवळ आता पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची सरकार पूर्ण काळजी घेईल आणि जर का झालेही, तरी ते लगेच काढले जाईल, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज नागपुरात आले असता विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या कारवाईसंदर्भात विचारले असता, एखाद्या गोष्टीचा कांगावा करणं ही जितेंद्र आव्हाड यांची स्टाईलच आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही गोष्टीचे उदात्तीकरण करण्याचा ते प्रयत्न करीत असतात. सगळ्यांना स्पष्टपणे माहिती आहे की, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह थियेटरमध्ये जाऊन जो तमाशा केला, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्यावरून पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर पुढील कारवाई झाली. अशा प्रकारे कुणीही कायदा हातात घेतला असता, तर कायद्यानुसारच हीच कारवाई झाली असती. कुठलीही वेगळी कारवाई झालेली नाही. पण आपण काहीतरी वेगळं काहीतरी केलं आहे, असं दाखवण्याच्या त्यांनाच नाद आहे, त्या नादातूनच हे सर्व प्रकार होत आहेत, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातून पुन्हा एक प्रकल्प मध्यप्रदेशात पळवण्यात आला, अशी ओरड होत आहे, याबद्दल विचारले असता, चुकीच्या गोष्टी प्रसारित करू नये, मिडियानेसुद्धा अशी माहिती प्रसारित करू नये. एकतर सगळी टाईमलाईन बघितल्यास ती संपूर्ण महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहे. एकही टाईमलाईन आमच्या सरकारच्या काळातील नाही. दुसरं म्हणजे केंद्र सरकारने अशा प्रकारचे तीन पार्क करायचे ठरवले आहे. त्यांपैकी एक पार्क दिला आणि दोन अद्याप दिलेले नाहीत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केंद्र सरकार वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजना करत असते. सर्व राज्यांकडून प्रस्ताव मागविले जातात आणि एक किंवा दोन राज्यांत तो प्रकल्प होतो, असे फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रातून हे गेले, ते गेले, असा कांगावा प्रत्येक वेळी करण्यात येतो. असा कांगावा करणं चुकीचं आहे. कारण जे अधिकारी हे काम करतात, त्याचा पाठपुरावा करतात, त्यांचेही मनोबल खचते. त्यामुळे कुठलीही माहिती न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माझे फोटो छापणे आणि जुन्या सरकारच्या काळात राज्याबाहेर गेलेले प्रकल्प आमच्या नावाने दाखवणे बंद केले पाहिजे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली.