पाकिस्तानच्या बेताल वक्तव्याविरोधात भाजपचे आंदोलन, पुण्यसह राज्यात १२०० ठिकाणी आंदोलन
पुणे, १७ डिसेंबर २०२२: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत सामर्थ्यशाली झाला आहे. पाकिस्तान भारतात दहशतवादी कारवाया करू शकत नाही तसेच भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची भारताची ताकद आहे. यामुळे हताश पाकिस्तानकडून मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याने याविरोधात पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. तर राज्यात १२०० ठिकाणी आंदोलने केली आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे संपूर्ण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. याचा निषेध करण्यासाठी राज्यात भाजपा कार्यकर्ते १२०० ठिकाणी आंदोलन करत आहेत. सर्व शहरे, जिल्हे व तालुक्यांच्या ठिकाणी आंदोलने होत आहेत. बिलावल भुट्टो यांचा पुतळा जाळून कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण जगामध्ये भारताला महत्त्वाचे स्थान मिळवून देत आहेत. भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला करण्याची ताकद भारताकडे मोदी यांच्या नेतृत्वात आहे. तो देश भारताच्या विरोधात बॉम्बस्फोट किंवा दहशतवादी कारवाया अशी कृती करू शकत नाही. दहशतवाद्यांना पोसणारा पाकिस्तान हतबल झाला आहे. पाकिस्तान कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे अशी वक्तव्ये केली जात आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाची बुलेट ट्रेन सुरू झाली असून हे असेच काम चालू राहिले तर आपले राजकीय अस्तित्व संकटात येईल, अशी भीती महाविकास आघाडीला वाटते व तेच त्यांच्या मोर्चामागचे खरे कारण आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची पिछेहाट झाली. आता राज्य गतीने पुढे जात आहे, यामुळे हा मोर्चा काढण्यात आला आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अपमान केला त्यावेळी आदित्य ठाकरे त्यांना मिठी मारत होते. महाविकास आघाडीच्या एका आमदाराने छत्रपती शिवाजी महाराजांसारखी वेषभूषा करून तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसमोर नतमस्तक झाला होता. ही महाविकास आघाडीची संस्कृती आहे. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
शहर अध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले,पाकिस्तानला भारताकडून पराभव स्वीकारावा लागला, तरी त्यांचा मूळ स्वभाव बदलत नाही. मोदींमुळे जगात शांतता प्रस्थापित होत आहे. पाकिस्तानातील जनतेचे लक्ष तेथील परिस्थितीवरून विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता बदलेला भारत आहे. महाविकास आघाडीचे नेते आज बोलत नाहीत. पंतप्रधान एका पक्षाचे नाहीत, ते देशाचे नेते आहेत. महाविकास आघाडीच्या स्वाभिमानाचे काय झाले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे, शहराध्यक्ष जगदीश मुळीक,महीला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ,आमदार माधुरीताई मिसाळ प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, आमदार सिध्दार्थ शिरोळे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक पोटे, दिपक नागपुरे, दत्ताभाऊ खाडे यांच्यासह मंडल अध्यक्ष, पदाधिकारी, माजी नगरसेविक आदी उपस्थित होते.