चंद्रकात पाटील, गडकरी, फडणवीसांवर मोठी जबाबदारी
मुंबई, १२ नोव्हेंबर २०२२ : गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. गुजरातमध्ये 2 टप्प्यात निवडणूक होत आहेत. त्यासाठी सर्वच पक्ष प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या निवडणूकीत गुजरातमध्ये पहिल्यांदाच आम आदमी पक्षही मैदानात उतरला आहे. गुजरातमध्ये ईशुदान गढवी ‘आप’चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत.
विविध पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. या दरम्यान भाजपने ( निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.भाजपने या प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे.
गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या १ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. स्टार प्रचारकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह एकूण 40 जणांच्या नावाचा समावेश आहे.
आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश
अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे. ज्यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे.गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचाही समावेश करण्यात आला आहे. या दोघांनीही निवडणूक लढवण्यास नकार दिला होता.
अभिनेता परेश रावल, भोजपुरी गायक आणि पक्षाचे खासदार मनोज तिवारी यांच्याशिवाय अभिनेता-राजकारणी रवी किशन आणि गायक-राजकारणी दिनेश लाल यादव ‘निरहुआ’ देखील या यादीत आहेत. गुजरातमध्ये एकूण 182 जागांसाठी 2 टप्प्यात निवडणूक होत आहे.
गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रम
पहिल्या टप्प्यासाठी 5 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार
दुसऱ्या टप्प्यासाठी 10 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार
अर्ज छाननी
पहिला टप्पा: 15 नोव्हेंबर
दुसरा टप्पा:18 नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
पहिला टप्पा: 17 नोव्हेंबर
दुसरा टप्पा: 21 नोव्हेंबर
किती टप्प्यात पार पडणार मतदान: दोन टप्प्यात निवडणूक
पहिला टप्पा: 1 डिसेंबर
दुसरा टप्पा: 5 डिसेंबर
मतमोजणीची तारीख: 8 डिसेंबर