बापटांनी शिंदेंना दिला शब्द “कसब्याची चिंता नको मी आहे”

पुणे, ११ फेब्रुवारी २०२३: खासदार गिरीश बापट यांची प्रकृती बरी नसल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांची भेट घेतली. यावेळी बापट यांनी कसब्याची चिंता करू नका, मी इकडेच बसलो आहे, आपले नेटवर्क असून, कामाला लागलो आहे. चिंचवडचीही जागा आपणच जिंकू, असा शब्द मुख्यमंत्री शिंदे यांना दिला.
घोले रस्त्यावरील महात्मा फुले संग्रहालयात मुख्यमंत्री शिंदे यांनी बापट यांची भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. त्यावेळी दोघेही जुन्या आठवणीत रंगले होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, किरण साळी आदी उपस्थित होते.
ही भेट झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, ‘‘गिरीश बापट यांची तब्येत बरी नसल्याने सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होते. ते माझे जुने मित्र आहेत. ते लवकर बरे होऊन पुन्हा कामाला लागतील. पोटनिवडणुकीबाबत मी बोलायच्या आधीच बापट यांनी स्वतःहूनच कसबा आणि चिंचवडच्या जागेवरचे आपले उमेदवार निवडून येतील. कसब्याची चिंता करू नका मी इकडेच बसलो आहे, आपले तेथे नेटवर्क असून, कामाला लागलो आहे असे बापट यांनी मला सांगितले.
या दोन्ही जागेवर अनेक वर्ष भाजपचे आमदार काम करत आहेत. आमदारांनी कामे केल्याने त्यांचा विश्‍वास आहे. त्यामुळे दोन्ही जागा आम्ही जिंकत आहोत, असे शिंदे यांनी सांगितले.

 

विश्वासहार्य राजकीय बातम्यांसाठी ज्वाईन करा “सरकार खबर” ग्रुप